प्रतिज्ञा
ऑगस्ट 14, 2021सणावली
नोव्हेंबर 28, 2021बेडकांची शाळा
आज चाचा नेहरूंचा वाढदिवस. छोट्या आणि पोक्तपणाचा आव आणणाऱ्या मोठ्यांच्या मनात दडलेल्या अश्या दोन्ही बच्चाकंपनींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवसाकरता हे खास बालकाव्य. तुम्हीही ऐका आणि छोट्यांनाही ऐकवा …ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LA3sNV73wMI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
बेडकांची शाळा
तिथे कावळा आला काळा
म्हणतो शिकवीन तुम्हाला
तो एकच माझा चाळा ॥ १ ॥
बेडूक म्हणती वाहव्वा खास
घे भूगोलाचा तू तास
कावळा म्हणाला चालेल
शिकवू लागला इतिहास ॥ २ ॥
गणिताची आली वेळ
कावळ्याचे न्यारे खेळ
बेरिज वजाबाकीची
तो करतो सारी भेळ ॥ ३ ॥
कावळा शिकवी मग भाषा
गोष्टी सांगे तो खाशा
बेडूक नाचती सारे
आणि कावळा वाजवी ताशा ॥ ४ ॥
काहीतरी पण घडले
बेडकांना नाही कळले
वर्गातील बाकांवरचे
कित्येक बेडूक गळले ॥ ५ ॥
झाले खाऊन खाऊन लठ्ठ
बेडूक होते ते मठ्ठ
बोलावून एकेकाला
तो कावळा करतो गट्ट ॥ ६ ॥
बेडकांची शाळा
तिथे उरला कावळा काळा
आता म्हणतो येथे मी
काढीन उंदरांची शाळा ॥ ७ ॥
बेडकांची शाळा
झाली उंदरांची शाळा
बेडकांची शाळा
झाली उंदरांची शाळा ॥ ८ ॥