एक भाऊ असावा
ऑक्टोबर 17, 2014राग
नोव्हेंबर 6, 2015संशयी ससा
शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . .
बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || धृ ||
डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा
ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा
खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक
खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा
चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || १ ||
परत जाऊन चमचे आणणं होतं त्यांना भाग
जाणार कोण सांगू त्याला येत होता राग
दहा वीस तीस चाळीस आपसात त्यांनी केलं
राज्य आलं त्याला म्हणती खाली जायला लाग
मी गेल्यावर खाल खीर असं म्हणून तो बसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || २ ||
हटून बसला तिथेच होता संशयी तो फार
बाकी तिघांनी नेट लावला तेव्हाच गेला हार
हिरमुसलेलं तोंड घेऊनी ससा संशयी जार्इ
खिरीभोवती वाट पाहत बसले तिघे यार
भूक लागली जिथे पाहती खीरच त्यांना दिसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || ३ ||
दोन तास होऊन गेले झाले ते आतुर
भुकेमुळे पोटामध्ये झाली सुरू गुरगुर
संशयी ससा आला नाही झाले चार तास
डोंगराखालचे बीळ त्यांचे इतके नव्हते दूर
तो आल्यावर खाऊ वचन पाळावे तरी कसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || ४ ||
वाट पाहून भुकेमुळे पण धीर त्यांचा सुटे
एक ससा काही वेळाने वैतागून मग उठे
जाऊन शोधू त्याला आधी खाऊ आपण खीर
चमच्यांशिवाय खीर खाल्ली तर बिघडलं कुठे
बाकीच्या दोघांचा त्याला काहीच विरोध नसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || ५ ||
खिरीच्या भांड्याला त्यांनी हात लावला जसा
झाडामागून पुढे आला संशयी तो ससा
होताच मला संशय तुम्ही खाऊन टाकाल खीर
माझ्याशिवाय खिरीला तुम्ही हातच लावला कसा
बघत राहीले तिघे ससे ना रडू येर्इ ना हसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || ६ ||
संशयी ससा ओढून घेता खाली पडले भांडे
पिकनिकची ती खीर सारी तळ्यामधे मग सांडे
बोलण्यासारखे उरले नव्हते बसले सारे ससे
मनात राहीले मनात ते जे खात होते मांडे
डोंगरावरच्या निर्मळ झर्यात खीर खाती मासे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || ७ ||
बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे || धृ ||