चतुर कुत्रा
फेब्रुवारी 4, 2011आई नावाचं मशीन
मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येतं की घरातील कामं आपण केल्याशिवाय होत नाहीत. मग वाटतं की लहानपणी ही कामं कशी अपोआप व्हायची. ह्याला कारण म्हणजे प्रत्येक घरात असतं एक आई नावाचं मशीन. हे मशीन कधी दमत नाही कधी थकत नाही आणि कधी कुरकुरतही नाही. पण मग हे मशीन चालतं तरी कशावर?
काल माझ्या घरी आल्या मैत्रिणी चिकार
खूप पसारा केला आणि झाल्या मग पसार
आवर पसारा म्हंटलं म्हणजे येतो मजला शीण
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || १ ||
सतत सुरू असते घरी माझी फर्मार्इश
आज चिकन बनव उद्या बनव स्वीटडीश
परवा बनव आइसक्रीम मग काय हवं आणखीन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || २ ||
रविवारी रात्री काम आठवतं येतं मजला रडू
क्राफ्टचं सामान सापडत नाही कुठे जाऊन दडू
सकाळी उठून बघते बॅगेत कागद कात्री पिन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ३ ||
अभ्यासाच्याकरता मला तीच जवळ लागते
आजारी मी पडले तर ती रात्रभर जागते
रोज रात्री सांगते मजला गोष्टी नवीन नवीन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ४ ||
मला नेहमी ताजं देऊन शिळं स्वत: खाते
घरची कामं कमी म्हणून का बाहेर पण ती जाते
बाबा म्हणतात तिच्याशिवाय घर चालणं रे कठीण
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ५ ||
माझ्याआधी उठते आणि माझ्यानंतर झोपते
घरामधल्या सगळ्यांसाठी खप खप खपते
इतकं काम करते जणू बाटलीमधला जीन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ६ ||
अशा आमच्या मशीनमध्ये एकदा बिघाड झाला
कधी नव्हे तो माझ्या आर्इस ताप तेव्हा आला
झोपून रहावं लागलं तिला दिवस पुढचे तीन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ७ ||
तीन दिवसांनी डाॅक्टर म्हणती अजून आराम करा
आर्इ म्हणते आराम कसला झाला आजार बरा
चौथ्या दिवशी सुरू झालं नेहमीचं रूटीन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ८ ||
असं आहे मशीन आमचं एकदम मल्टीपर्पज
चालतं कसं अथक आली आहे मजला समज
आमचं प्रेमच इंधन तिचं नेहमी तिजला देर्इन
आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन || ९ ||