कविता
बालकाव्य
लहान मुलांचं आपलं एक सुंदर काल्पनिक जग असतं. मोठ्या माणसांनी घातलेल्या व्यावहारिकतेच्या पाण्याने त्यातील रंजकता विरळ होण्यापूर्वी त्या जगात अशक्य असं काही नसतं. त्यामुळे बालकाव्य लिहिताना आपल्या कल्पनाशक्तीच्या वारुचा लगाम सोडून त्याला चौखूर उधळू देता येतं. ह्या अशाच काही लहान मुलांच्या कविता.
नोव्हेंबर 14, 2021
आज चाचा नेहरूंचा वाढदिवस. छोट्या आणि पोक्तपणाचा आव आणणाऱ्या मोठ्यांच्या मनात दडलेल्या अश्या दोन्ही बच्चाकंपनींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवसाकरता हे खास बालकाव्य. तुम्हीही ऐका आणि छोट्यांनाही ऐकवा ... बेडकांची शाळा तिथे कावळा आला काळा म्हणतो शिकवीन तुम्हाला तो एकच माझा चाळा बेडूक म्हणती वाहव्वा खास घे भूगोलाचा तू तास कावळा म्हणाला चालेल शिकवू लागला इतिहास गणिताची आली वेळ कावळ्याचे न्यारे खेळ बेरिज वजाबाकीची तो करतो सारी भेळ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LA3sNV73wMI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 14, 2018
बालदिनाच्या मनापासून शुभेच्छा! १४ नोव्हेंबरचा दिवस आला की बालपण आठवतं. तेव्हा FB आणि WhatsAppवर संदेश येत नसले तरी बालविशेषांक घरी येत असत. किशोर, कुमार, चंपक, चांदोबा.... त्यातील गोष्टी, कविता, चित्रं, कोडी... त्या आठवणी ताज्या करणारं हे एक बालकाव्य ‘शेपटी’ माझ्या बालमित्रांसाठी आणि बालपणीच्या मित्रांसाठीही... गोळा करूनी प्राणी सारे माकड वनात भाषण ठोके शस्त्र मानवाचे ते न्यारे वापरतो तो आपुले डोके मारूनिया बुद्धीची बढार्इ पुढे बोलले माकड कपटी फरक एवढा त्याला नाही मला मात्र ही असे शेपटी ॥ प्राणी सारे लहान मोठे ऐकुन पडले तेथ विचारी माणसास घाबरूनी होते ओळख ज्याची महाशिकारी माकड बोले काहीबाही फुगवून आपुली छाती चपटी फरक एवढा त्याला नाही मला मात्र ही असे शेपटी ॥ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Kd224iV7Pts ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 12, 2018
उद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवामुळे पर्यावरणाबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकरता गणपती दरम्यान आणि एरवीही पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल ह्याबद्दल एक आरती लिहून देण्याची संधी मिळाली. ती आरती सादर करत आहे... जय देव जय देव जय मंगलमुर्ती प्रदूषणाने त्रासली धरती जय देव जय देव ॥ POPची मूर्ती हवी कशाला शाडूच्या मूर्तीत आणू तुम्हाला Thermocolचे मखर नको आम्हाला Plastic Nylon सर्वांनी टाळा जय देव जय देव ॥ टाकणार नाही ताटात पोळ्या आवरून ठेवू आमुच्या खोल्या बघाल फरक आपुल्या डोळ्या निर्माल्येही टाकू कचऱ्यात ओल्या जय देव जय देव ॥
एप्रिल 17, 2015
शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . . डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे
एप्रिल 19, 2013
परीक्षा संपून आता निकालांची वेळ जवळ आली आहे. एकीकडे 'मुलांचा निकाल आहे, आपला नाही' ह्याचा असुरी आनंद तर दुसरीकडे 'काय दिवे लावले आहेत कोण जाणे' ह्याची चिंता अशा कातरीत तुमच्यापैकी बरेच जण सापडले असतील. घरातील तणाव कमी व्हावा म्हणून खास बाळगोपाळांकरता लिहिलेली ही कविता त्यांना अवश्य वाचून दाखवा … विसरून गेले त्याच्यानंतर बाकीचे पेपर सुचत नव्हतं कोणावरती फोडू मी खापर एवढुसे ते मार्क बघुनी होई तोंड कडू आईला मी काय सांगू आलंच मला रडू माझ्या जागी स्वतःस ठेवा तुम्ही सुद्धा रडाल परीक्षेचा नाही लागलाय माझाच आज निकाल
सप्टेंबर 7, 2012
गणपतीबाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचा अगदी लहानपणापासूनचा लाडका देव. आजच्या संगणक आणि टीवीच्या काळातील बाळगोपाळ मंडळीही बाप्पांच्या आगमनाने तेवढीच उल्हासित झालेली दिसतात. बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आरत्याही आल्या. लहानपणी त्या संस्कृतप्रचुर 'रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा...' वगैरे आरत्यांमधील बरेच शब्द पार डोक्यावरून जात असत (काही शब्द तर अजूनही डोक्यावरून जातात). त्या आठवणी स्मरून खास बच्चेकंपनीकरता ही 'बाप्पांची आरती' तुमच्या घरातील आणि आजूबाजूच्या बाळगोपाळांना आवडते का ते पाहा... कित्ती दिवस झाले गेलात परत तुमच्यावाचून आता नाही हो करमत सांगायच्यात तुम्हाला बातम्या कितीतरी बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी तुमचं येणं म्हणजे मज्जाच मोठ्ठी मोदकांचं जेवण शाळेला सुट्टी पाहुणे घरी वर्दळ भारी बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी