
चविताक
जानेवारी 4, 2025बाटलीतला राक्षस

लहानपणीची बाटलीतल्या राक्षसाची गोष्ट आठवतेय ना? परीकथेतला राक्षस परीकथेतच राहायचा ते बरं होतं. पण आता एक बाटलीतला नवीनच राक्षस मानवाने बाहेर काढला आहे. त्याच्या कामाचा आवाका परीकथेतल्या राक्षसासारखाच आहे ज्याचा आता आपल्याला त्रास व्हायला लागला आहे. परीकथेतला राक्षस माणसाच्या चातुर्याने परत बाटलीत गेला. हा राक्षस मात्र माणसापेक्षा जास्त चतुर आहे.. त्याची ही गोष्ट.
एका मोठ्या कंपनीची ही बातमी आहे आतली
त्या कंपनीच्या एका एम्प्लॉयाला सापडली एक चमत्कारी बाटली ॥
आतून एक राक्षस निघाला उघडताच झाकण
म्हणाला कैक युगं करत होतो मी ह्या बाटलीची राखण ॥
काम करण्याचा माझा अचाट आहे आवाका
कोणतंही आणि कितीही काम सांगा फक्त एक नियम याद राखा ॥
मी थकत नाही ना कंटाळत ना झोप मला ना भूक
कामाशिवाय मला ठेवण्याची मात्र तू कधीही करू नकोस चूक ॥
एम्प्लॉयाने दिली त्याला ढीगभर कामं घरची
तयार करून ठेवली आणखीन शंभर कामं दारची ॥
राक्षस पटापट कामाला लागला ना कंटाळला ना थांबला
पुढची कामं दे म्हणून थोड्याच वेळात पुन्हा उभा ठाकला ॥
एम्प्लॉयी धावत गेला बॉसकडे दाखवायला तो राक्षस
बॉसही झाला खूश दिला एम्प्लॉयाला चांगला रग्गड बोनस ॥
कंपनी होती तशी छोटी पण महत्वाकांक्षा होती भारी
काबीज करायची होती कंपनीला जगातील मार्केटं सारी ॥
बॉस म्हणाला राक्षसाला, मित्रा, असा काहीतरी कर खेळ
आमच्या कस्टमर्सना आमच्या पोर्टलवर घालवावासा वाटेल दुप्पट वेळ ॥
राक्षस लागला कामाला त्याची क्षमता होती असीम
धडाधड शोधून तो लोकांना पाठवू लागला विडिओ आणि मीम ॥
लोकांच्या चागलंच पचनी पडलं राक्षसाचं ते तर्कट
आणि बघता बघता कंपनीचा धंदा झाला दुप्पट ॥
बॉस हुरळला मनात तरी त्याचं झालं नव्हतं समाधान
राक्षसाला म्हणाला, भले बहाद्दर! आणखीन आण आणखीन आण ॥
राक्षसाने तोवर जाणली होती मानवी मनाची खोड
हिंसा आणि विध्वंस पाहण्याची असते मानवी मनाला ओढ ॥
हिंसक आणि विध्वंसक कंटेंट पोर्टलवर दिसू लागला
आणि पोर्टलच्या कस्टमर्सचा आकडा भराभर वाढू लागला ॥
बॉसला जणू हर्षवायू झाला दिसू लागला प्रॉफिट भरघोस
राक्षसाला म्हणाला, तू काय, अरे मीच तुला सांगतो, आता थांबू नकोस ॥
अनुभवातून राक्षसाला मिळाली होती मानवी मनाची आणखीन एक चावी
प्रत्येकाच्या मनात होता शत्रू एक मायावी ॥
आपल्या दुःखाकरता जो तो देई दुसऱ्या कुणाला दोष
कुणाचा दुसऱ्या जाती, धर्मावर तर कुणाचा भाषा, प्रांतावर रोष ॥
ज्याला ज्यात असुरी आनंद तेच लागलं दिसू
राक्षसाने असा विखारी कंटेंट बनवला की वातावरण लागलं नासू ॥
राक्षस स्वतः कोणाचीच घेत नव्हता बाजू
पण ज्याला जे हवंय ते देऊन कंपनीची मात्र पोळी लागला भाजू ॥
पोर्टल बघताना कामाची पर्वा राहिली नाही कुणाला
आणि इथे कंपनीच्या शेअर्सचे भाव मात्र भिडू लागले गगनाला ॥
एकमेकांशी वाद घालून दुरावू लागले बालपणीचे मित्र
अहो एकाच कुटुंबातील सदस्यांमध्येही हेच दिसू लागलं चित्र ॥
कुणाचं काही बिघडलं नसतं जर ही गोष्ट इथे थांबली असती फक्त
पण कंपनीने खतपाणी घातलेल्या हिंसेमुळे आता रस्त्यावरही सांडू लागलं रक्त ॥
देशोदेशीच्या सरकारांनी मग कंपनीच्या बॉसचे कान टोचले
त्याने मात्र मी त्या गावचाच नाही म्हणून कानावर हात ठेवले ॥
म्हणाला मी तर फक्त धंदा वाढवत होतो त्यात काय गैर
मी राक्षसाला कधीच सांगितलं नाही वाढव हिंसा आणि वैर ॥
मानवतेला काळिमा मानवांनीच फासला नाही काय
राक्षस तर मानवच नाही मग त्याला त्याचं काय ॥
राक्षस आपले जे विचार तेच आपल्याला दाखवतो
आपण मग दुसरी बाजू विचारात न घेता तेच विचार नाचवतो ॥
बाटलीतला राक्षस कदाचित पुन्हा बाटलीत जाऊन बसेल
आपल्या मनातल्या राक्षसावर मात्र सांगा उपाय कोण करेल ॥