बाटलीतला राक्षस
फेब्रुवारी 3, 2025प्रेम – त्याचे आणि तिचे

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा! दशकानुदशकांच्या सूक्ष्म आणि तपशीलवार चिकित्सेनंतर अस्मादिक काही निष्कर्षांपर्यंत येऊन थडकले आहेत. त्या निष्कर्षांवर आधारित हे एक स्वल्पचिंतन..
दिसलं तळं की पुरुष उडी मारतात बिनधास्त
बायका मात्र तपासतात पाण्याचं तापमान आणि खोली आहे का रास्त
नवलच आहे इतके सारे प्रेमविवाह कसे ठरतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥
मुंग्यांच्या वारुळासारखं पुरुषांचं प्रेम असतं
जे प्रत्येक सावध-बेसावध सावजावर तुटून पडतं
सावजाच्या रंग-रूप-आकाराचे त्याला विधिनिषेध नसतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥
बायकांचं प्रेम म्हणजे मात्र जणू बिबट्याची शिकार
आधी पूर्णपणे हेरतात रंग-रूप आणि आकार
सावजाचे सावज बनण्याकरता काही नियम असतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥
एक ओझरता स्पर्श, एक स्मितहास्य, एखादा कटाक्ष मधाळ
इतकंच पुरेसं असतं पुरुषांनी होण्याकरता घायाळ
स्पर्श, हास्य, कटाक्षाने बायका मात्र लगेच होतात सावध
विचारार्ह यादीतून तो पुरुष लगेच होतो गारद
हे असले नियम आणि अटी फार कमी पुरुषांना समजतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥
जबाबदाऱ्या कमी हव्या, हवं जास्त शिक्षण आणि पगार
दिसायला देखणा असेल तर आणखीनच बहार
अशी लांबलचक असते बायकांच्या अपेक्षांची यादी
दिसते कशी एवढं एकच बघतात पुरुष प्रेमात पडण्याआधी
त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुढाकार घेणारे पुरुषच असतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥
प्रेमभंगानंतर पुरुषांचा होतो रोमिओ, मजनू नाहीतर वासू
पण फार दिवस टिकत नाही ते चेहेऱ्यावरचं उदासवाणं हसू
काही दिवसांतच इतर तळी त्यांना खुणावू लागतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥