… अडलं नाही बुवा
डिसेंबर 18, 2022प्राक्तन
मार्च 13, 2023प्रेमाचा पाढा
प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रेमात पडल्यावर माणसाचं विशेषतः पुरुषाचं माकड होतं ह्यात काही वाद नाही. प्रेमात पडलेला राजा असो वा रंक, बलदंड असो वा पेदरट, कॉलेजकुमार असो वा ऑफिसमधला बॉस.. क्यायच्या क्याय वाटणं आणि क्यायच्या क्याय वागणं साहजिक असतं. आणि मग ते तसं वाटणं आणि तसं वागणं बोलण्यात दिसून येणं हे ओघानेच आलं..माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/7bKCy8pf_Ek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥
एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥
तीन मैत्रिणी म्हणती भेटला नाहीस दिवस फार
चल पिक्चरला जाऊ म्हणतात मित्र माझे चार
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आता इतर कोणाच्याच आवडत नाहीत बाता ॥
पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा
कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥
सात दिवस पडली नाही तुझी माझी गाठ
अंधारून गेल्या माझ्या दिशा जशा आठ
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
नाकात गेला चमचा माझा ब्रेकफास्ट खाता खाता ॥
नऊ आले नाकी गोड लागत नाही चहा
विसरून गेलो पाढा जेव्हा दिवस झाले दहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
दुसरा पाढा सुरू झाला पहिला संपून जाता ॥
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥