शेवटची भेट
जानेवारी 20, 2012ओळख
फेब्रुवारी 20, 2015जाणार नाहीस ना
हल्ली internet आणि mobileवर दहापैकी नऊ विनोद हे बायको ह्या व्यक्तीबद्दल असतात. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं कारण ज्यावेळी पुरुषावर कौटुंबिक, सामाजिक किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा collegeमधल्या मैत्रिणी किंवा सिनेमातल्या नायिका नाहीत तर हीच अर्धांगिनी पुरुषाच्या मागे ठामपणे उभी राहते. अशा वेळी धास्तावलेला पुरुष एकच प्रश्न विचारत राहतो . . . तू मला सोडून तर ‘जाणार नाहीस ना?’
वळण आलं वाटेमध्ये सरळ जाणार नाहीस ना
तेव्हा माझा हात सोडून दूर जाणार नाहीस ना
कर्ता आहे मी ह्मा घरचा माझ्या इच्छा माझे निर्णय
छायेत माझ्या राहून तू कोमेजून जाणार नाहीस ना
माझ्याकरता नावसुद्धा आपलं मागे सोडून आलीस
माझं लाडकं तुझं ‘मी’पण विसरून जाणार नाहीस ना
मनाच्या ह्मा तारूकरता तुझं असणं दीपस्तंभ
परत येण्या निघालो तर विझून जाणार नाहीस ना
आव आणतो पौरूष्याचा तुला आधार देण्यासाठी
मला आधार लागेल तेव्हा खचून जाणार नाहीस ना
घराबाहेर पडलो असता मोहाची सारी दुनिया ती
प्रमाद माझे सारे सहन करत जाणार नाहीस ना
निकड भासते पदोपदी मज नसते जेव्हा सानिध्य
मला उगाच स्वावलंबी करून जाणार नाहीस ना
माझ्या कर्तुत्त्वाच्या मागे खंबीर मूर्ती तुझी असे
संधी तुलाही मिळेल तेव्हा कच खाणार नाहीस ना
ह्मा हृदयाच्या गाभार्यातील सुगंध आहे तुझ्यामुळे
धुराप्रमाणे उदबत्तीच्या विरून जाणार नाहीस ना
विचार येता घाबरतो तू माझ्याआधी गेलीस तर
मी गेलो जर आधी तूही मोडून जाणार नाहीस ना
वदलो नाही आजवरी मी भाव मनातील तुला कधी
आज सांगतोय ऐकून तू अवघडून जाणार नाहीस ना
वळण आलं वाटेमध्ये सरळ जाणार नाहीस ना
तेव्हा माझा हात सोडून दूर जाणार नाहीस ना