प्रेमाचा पाढा
फेब्रुवारी 14, 2023मोकळा वेळ
मार्च 26, 2023प्राक्तन
प्राक्तन, नियती, नशीब, भाग्य, दैव, ललाटीचा लेख, विधिलिखित, भोग… भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्याकरता आपण किती शब्दांचा वापर करतो. उद्याची तजवीज करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्या मनात असते आणि तसे आपण सरळ रेषेत वागत असतो. मात्र उद्या येणाऱ्या एखाद्या अनपेक्षित वळणाकरता आपल्याला कधीच तजवीज करता येत नाही.माझी ‘प्राक्तन’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/okTJP32oNBo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गरुडराज नभी विहरत होते बोल मधुर ते पडले कानी
पोपट पृथ्वीवरती होता मधुर जयाची होती वाणी
गुणी अशा पोपटास भेटून गरुडराजही झाले अंकित
गरुड शुकाची मैत्री पाहून तिन्ही लोक ते होती अचंबित
काहीच नव्हते समान तरीही एकमेकांस स्वभाव गमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥
गरुडराज एकाकी होते पक्ष्यांचे जरी होते ते नृप
चतुर निडर गुणी पोपट होता मित्राचे त्यां मोठे अप्रूप
एक दिशी पण शुकबोलांनी गरुडराजास जडली चिंता
सत्य असे का स्वर्गी तुमच्या अमरत्वाची असे वदंता
मर्त्यच मी ह्या भूमीवरचा कसे मैत्रीचे बांधू इमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥
गरुडराज शोकाकुल होऊन स्वामी श्रीविष्णूंना पुसती
त्राहि माम दुःखातूनी स्वामी विरहवेदना आताच डसती
श्रीविष्णू गरुडाला घेऊन सदन गाठती श्रीब्रह्मांचे
सृजनदेव श्रीब्रह्मा वदले कार्य हे असे शिवशंभूंचे
चला भेटू या श्रीशंभूंना कैलासपर्वती जे रमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥
श्रीविष्णू श्रीब्रह्मा वदती अडचण गरुडाच्या मैत्राची
शिवशंकरहो तुम्हीच द्यावी देणगी शुका अमरत्वाची
श्रीशंकरही प्रसन्न झाले ऐकून मैत्री जगावेगळी
यमराजांना बोलविण्याला दूत धाडला कैलासातळी
येताना यमराज पाहूनी वदन गरुडराजांचे उमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥
श्रीशंभूंचा आदेश ऐकूनी यमराजांनी मान तुकवली
ठाऊक मजला गरुड शुकाने मैत्री अपुल्या मनी रुजवली
मरण शुकाचे लांबविण्याला अट ऐशी ठेविली घालूनी
ब्रह्मा विष्णू महेश सारे जेव्हा येतील एक ठिकाणी
अशक्य तेव्हा मला वाटला योग अचानक संभव झाला
दूत मृत्यूचा आताच स्वर्गी प्राण शुकाचे घेऊन आला
प्राक्तनापुढे सर्वश्रेष्ठ जे ब्रह्मा विष्णू शिवही वरमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥