एकांतवास
एप्रिल 7, 2020जन्मठेप
मे 15, 2020पाचावर धारण
बाळ श्रीकृष्णाचा उच्छाद कमी करण्याकरता यशोदा त्याला दगडी उखळीला बांधून ठेवत असे. सरकारने कोविड विषाणूमुळे टाळेबंदी जाहीर केली आणि प्रत्येक पालकाला आपल्या घरात ह्या उखळीची निकड भासू लागली. ह्या बाटलीतल्या राक्षसांचं काय करायचं असा यक्षप्रश्न घरोघरी पडला. मात्र घरोघरी ह्या प्रश्नांचं उत्तरही लवकरच मिळालं…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/r1xJ7p22ZkE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
कोविड विषाणूशी लढायला सरकारने लॉकडाऊनची वेसण कसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥ धृ ॥
शाळा, खेळ, सिनेमे, हॉटेलं… बाहेरचं काहीच नाही हे जेव्हा कळलं
तेव्हा आ वासून पालकांच्या तोंडाकडे बघू लागली ही त्यांचीच पिल्लं
रोज ह्यांची करमणूक कशी करायची बुद्धीचा लागू लागला कस
प्रत्येक घरात कोंडले होते हे छोटे छोटे बाटलीतले राक्षस
त्यांच्याशी केलेली वाटाघाटींची बोलणी पार फसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥ १ ॥
कुणी इडन गार्डन्स, कुणी चेपॉक, कुणी घराचं केलं वानखेडे
ही आपलीच मुलं आहेत की पळून आले आहेत इस्पितळातून वेडे
कामातून मोकळे झालो आहोत ह्याची जराही लागली कुणकुण
की ‘कंटाळा आलाय’ म्हणून ह्यांची सुरु व्हायची भुणभुण
विचारू लागली अभ्यास नाही पण ही सुट्टी असली कसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥ २ ॥
कुणी महत्त्वाच्या कागदांची विमानं तर कुणी कपांचा केला चेंडू
कुठे कुठे लक्ष पुरवायचं पालकांचा शिणू लागला मेंदू
त्याने मला मारलं, ती मला बोचकारते सुरु झाल्या आरोळ्या
क्वालिटी फॅमिली टाईमचं श्रीखंड गायब, राहिल्या नुसत्याच चारोळ्या
कॅलेंडरची पानं तारखा सरकवायचं सोडून जणू रुसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥ ३ ॥
आमच्या लहानपणी बसले असते चांगले दोन दणके
मेंदू ठिकाणावर यायचा जेव्हा हलायचे पाठीतील दोन मणके
ह्यांना साधी ओरडायचीही चोरी जरी ताटात टाकून दिली भाजी
आईच्च्या गावात कुणी शोधून काढली चाईल्ड सायकॉलॉजी
पित्झा नाही बर्गर नाही ही वस्तुस्थिती मनाला डसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥ ४ ॥
पण लॉकडाऊनचा काळ वाढला आणि त्याचं कमी होऊ लागलं अप्रूप
आणि काही दिवसांत ह्या बालगोपाळांचं एक नवंच दिसू लागलं रूप
ज्यांचं अवखळ, हट्टी, मस्तीखोर हेच रूप ठाऊक होतं फक्त
तीच मुलं वागू लागली होऊन मोठ्यांहूनही पोक्त
आपल्याच बछड्यांची ही दुसरी बाजू दिसली
आणि घरोघरी पालकमंडळी आश्चर्याने बघतच बसली ॥ ५ ॥
‘मला आत्ता बाहेर जायचंय’ हे डोक्यातून काढून टाकलं खूळ
भाजी आवडली नाही तर पोळीबरोबर खाऊ लागली तूपगुळ
‘बाबा तुझा बिघडलाय तर तुला देतो माझा हेडफोन’
‘आई चल विडिओ कॉन्फरन्सिंग शिकवते मिनिटं लागतील फक्त दोन’
‘डॅड जोक्स’वरही मुलं एकदा खळखळून हसली
आणि घरोघरी पालकमंडळी आश्चर्याने बघतच बसली ॥ ६ ॥
मी केर काढतो, मला शिकव ना घासायला भांडी
तू पोळ्या कर, कुकर लाव मी चिरून देतो भेंडी
आता लॉकडाऊनचा काळ आणखीन वाढला तरी वाटणार नाही खंत
कारण घरोघरी मदत करतायत हे छोटे छोटे संत
मित्रमैत्रिणींइतकंच कुटुंबही महत्त्वाचं ही भावना मनात ठसली
आणि घरोघरी पालकमंडळी आश्चर्याने बघतच बसली ॥ ७ ॥
कोविड विषाणूशी लढायला सरकारने लॉकडाऊनची वेसण कसली
आणि घरोघरी पालकमंडळी आश्चर्याने बघतच बसली ॥ धृ ॥