
प्रेम – त्याचे आणि तिचे
मार्च 8, 2025
एका मैत्रीचं थडगं
मे 1, 2025न वटलेला चेक

जागतिक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा! शारीरिक आरोग्याइतकंच, किंबहुना थोडं जास्तच महत्त्वाचं मानसिक आरोग्य असतं. स्वतःच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना जेव्हा संकटं घेरतात तेव्हा मनाला उभारी देण्याकरता कुणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणंही पुरेसं असतं..
बागेमध्ये बसला होता चुरगळलेला वेश
चेहरा होता उदास होते अस्ताव्यस्त केस
तरूण होता मनात त्याच्या विचार होते घोळत
स्वत:शीच बोलत होता हात होता चोळत
वृद्ध पाहात बसला होता जवळच बाकावर
जाऊन त्यास म्हणाला तरूणा स्वत:ला सावर
शून्यात नजर लावून तरूण म्हणे सावरू कसा
नोकरी गेली माझी त्याचा दाटून आला घसा
खिशामधून चुरगळलेला कागद काढला एक
आज मिळाला फुल अॅण्ड फायनल सेटलमेंटचा चेक ॥ १ ॥
बायको मुलं आहेत घरी आणि आहे आई
ह्या पैशांवर फार दिवस घर चालणार नाही
नोकरी दुसरी मिळणार नाही कितीही करुणा भाका
धंद्यासाठी पैसे नाहीत प्रसंग आला बाका
वृद्ध म्हणाला सेटलमेंटचे पैसे तू वापर
मी मदत करतो आयुष्याला तू सावर
कोरा चेक सही करून देताना म्हणाला
लागता मदत रक्कम भर येईल जी मनाला
माझी काळजी नको माझ्या इस्टेटी अनेक
तरूण पाहत राहिला हाती धरून कोरा चेक ॥ २ ॥
काय म्हणाला वृद्ध तरूण विचार करतो खूप
कोरा चेक पाहून त्याला आला नवा हुरूप
काढला छोटा धंदा त्याने केली अन् मेहनत
वाढत गेला धंदा त्याचा वाढत गेली पत
संकटं तर खूप आली नाही असं नाही
प्रत्येक वेळी कोरा चेक धीर देऊन जाई
आयुष्यात सावरला विसरला नाही ऋण
एकच होती त्याच्याकडे वृद्धाची त्या खूण
वृद्धाचा त्या पत्ता बँकेत मिळेल मला बहुतेक
असं म्हणून बँकेत गेला हातात होता चेक ॥ ३ ॥
अकाउंट त्यांचं बंद होऊन पाच वर्षं झाली
कारण दिलं आहे मृत्यू मॅनेजर म्हणाली
विचारते ती काय झालं पाहून त्याची व्यथा
हसू आवरलं नाही तिजला ऐकून त्याची कथा
अहो इतके शिकलेले पण फसलात तुम्ही पाहा
अकाउंटमध्ये जास्तीत जास्त रूपये होते दहा
बाहेर आला तेथून त्याचं मन होतं रडत
फसलो नाही आपण त्याला नक्की होतं कळत
वृद्ध पाठीराखा होता संकटात प्रत्येक
खिशात ठेवून दिला त्याने न वटलेला चेक ॥ ४ ॥
जन्मासंगे असाच चेक मिळतो प्रत्येकाला
मरण, मृत्यू, काळ अशी बरीच नावं त्याला
सेटलमेंटचा चेक मात्र असतो आपल्या हातात
धाडस, जिद्द, धैर्य म्हणून त्याला ओळखतात
जीवन देतं अनेक पर्याय महत्त्वाची बाब
मिळोत कमी मार्क किंवा जावो तुमचा जॉब
ओळखून आपल्यामधले हुन्नर द्यावा त्याला न्याय
मृत्यूचा कवटाळू नये शेवटचा पर्याय
सेटलमेंटचा चेक हाती शक्यता कित्येक
मरणाचा तो खिशात ठेवा न वटलेला चेक ॥ ५ ॥