सहावं महाभूत
ऑक्टोबर 17, 2023एकमत
ऑगस्ट 21, 2024नग्न सत्य
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एका युरोपीय दंतकथेनुसार एकदा सत्य आणि असत्याची भेट झाली. त्या भेटीवर आधारित चित्रकार जाँ लिआँ जेरोमने काढलेलं ‘Naked Truth’ नावाचं चित्रही जगप्रसिद्ध आहे. सध्या आपल्या देशात जो वाचाळ धुरळा उडवला जातोय त्या पार्श्वभूमीवर ही दंतकथा तुम्हाला सत्यकथा वाटली तर त्यात नवल नाही..
सत्याच्या भेटीस एकदा आले पाहा असत्य
रीतीनुसार सत्यही करी असत्याचे अतिथ्य
जुनी गोष्ट आहे तरीही ऐकुनी एकदा पाहा
सत्यामध्ये ह्या गोष्टीच्या लपले मोठे तथ्य ॥
सत्यास म्हणते असत्य आजचा दिन बघ आहे छान
संशयग्रस्त सत्य पण पाहे वरती करुनी मान
सत्यवचन ते बघता सत्याच्या येई लक्षात
हर्षोल्हासी दिसत सृष्टीचे होते पानन् पान ॥
फिरत वनातून आले दोघे असे जेथ पुष्करणी
असत्य म्हणते पाहा किती आल्हाददायी हे पाणी
आशंकित पण सत्य पुन्हा पाही पडताळून सत्य
परंतु भासे खचित असे आल्हाददायी ते चरणी ॥
जलक्रीडा करण्यास काढती वस्त्रे दोघे तेथे
हरखून गेले सत्य सलील ते आनंद इतुका देते
असत्यास पण कळले फळले होते कपट तयाचे
वस्त्रे चोरून सत्याची पोबारा करी कुठे ते ॥
अचंबित ते सत्य येतसे पुष्करणी त्यागून
असत्य कोठे फिरे विचारत गेले अन् भागून
बघता सारे फिरविती नजरा अशी त्याची अवस्था
असे तिरस्कृत झाले गेले जळी पुन्हा लाजून ॥
तेव्हापासून सत्य आपुला चेहरा लपवून राही
घालून वस्त्रे सत्याची अन् असत्य मिरवीत जाई
वस्त्रांमध्ये काय दडे ते कुणास पर्वा नसते
नग्न सत्य ह्या जगती कोणा पाहावयाचे नाही ॥