पुरुषप्रश्न
मार्च 8, 2022छेड
नोव्हेंबर 25, 2022देव
हल्लीच्या तापलेल्या (किंवा तापवलेल्या) राजकीय वातावरणात देवाला बरे दिवस आले आहेत. तसा सर्वसामान्य माणसाचा देवावर विश्वास असतोच. संकटसमयी बहुतेकांना देवाचाच आधार वाटतो. मात्र देव म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर प्रत्येक व्यक्ती खचितच वेगळं देईल.ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NJU_PDnFHcE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एक किरण आशेचा जेव्हा थकती सर्व उपाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
परीक्षा होती आज माझी
फुटला होता घाम
तयारी तर काहीच नव्हती
सुचत नव्हतं काम
रात्रभर पाऊस पडला
जगबुडी आली
पेपर पोहोचले नाहीत आणि
परीक्षा रद्द झाली
गेल्या शतकात पडला कधी असा पाऊस काय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
संध्याकाळी ऑफिसमधले
मित्र भेटले चार
वाढदिवस लग्नाचा मी
विसरून गेलो पार
बार सगळे बंद होते
सुट्टी कसली होती
घरी पोहोचलो माझ्यासाठी
बायको नटली होती
आमच्यासारख्यांसाठीच काही डेज असतात ड्राय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
लहान मूल गर्दीमध्ये
वाट चुकलं होतं
अनोळखी चेहरे पाहून
पार बुजलं होतं
गळ्यात आयकार्ड गेली एका
इसमाची नजर
चिमुकला हात धरून
गाठून दिलं घर
छोटुल्याला बघुन आई रडली धाय धाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
गडद अंधार त्यात पाऊस
रात्र होती वैरी
एकटी मी चार मवाली
जाऊ कशी घरी
बसस्टॉपवर तो आला आणि
नुसता उभा ठाकला
कोण कुठचा कोणास ठाऊक
पण आधार मला वाटला
बस आल्यावर गेला पुन्हा भेटेल तरी काय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
दोन मनं जुळत नाहीत
एकत्र का राहा
घटस्फोटाचा कायदा आहे
ह्याचसाठी पाहा
अशा वेळी गोड बातमी
दोघांनाही कळली
दुभंगलेली मनं नाजूक
धाग्याने त्या जुळली
दुधापेक्षा मौल्यवान दुधावरची साय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
लोकलमधून लटकत होतो
बॅगेकडे लक्ष
खांबामुळे होणार होता
माझा कपाळमोक्ष
माझ्या दिशेने गर्दीमधून
हात आले चार
एवढ्या गर्दीत आत घेतलं
जसा चमत्कार
खरं तर आत जागा नव्हती ठेवायलाही पाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
परगावाहून आलो तर
दंगल पेटली होती
माणूस माणसाला कापत होता
शुद्ध कुणाला नव्हती
टॅक्सी ड्रायवर एक भेटला
तेव्हा मला भला
बायको मुलांना आत बसवा
इथून लवकर चला
जीवाचं जे मोल होतं मीटरवर दिसेल काय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
युद्धाच्या त्या धुमश्चक्रीत
संपली शेवटची गोळी
अन् समोर होती दुष्मनाच्या
बंदुकीची नळी
भाग जा जल्दी शब्द
आले त्याच्या तोंडून
तू आणि मी काय मिळवतोय
आपापसात भांडून
काळ आला होता वेळ आली नव्हती काय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
युगानुयगं शोधत त्याला
माणूस आपला फसतो
आपल्यासमोर उभा राहून
देव फक्त हसतो
माझा देव मोठा आणि
तुझा देव लहान
अरे, माणसामधला देव असतो
देवापेक्षा महान
मंदीर आणि मशिदीमधून देव भेटतो काय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥
एक किरण आशेचा जेव्हा थकती सर्व उपाय
देव देव म्हणतात ज्याला असाच असतो काय ॥