सणावली
नोव्हेंबर 28, 2021गुढीपाडवा
डिसेंबर 16, 2021देव बसला वर ..
देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल ..ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
नेते असे मातले त्यांची भरतच नाही झोळी
कार्यकर्त्यांच्या सरपणावर भाजतात आपली पोळी
त्याची दक्षिणाही म्हणतात ह्यांच्याच घशात जाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
भाऊ-दादा नावे गुंड कुणालाही धरतात
पोलीस असे साधे लोक त्यांनाही घाबरतात
त्याचीच बहीण न्यायदेवता तिला नाही घाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
गरिबांची होत नाहीत साधी साधी कार्य
प्रत्येक झारीत सरकारच्या बसले शुक्राचार्य
पगार मिळाला तरी कचेरीत जो तो पैसा खाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा
अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा
भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
प्रदूषण वाढलंय तापमान वाढलंय पृथ्वी गेली कावून
अवकाळी अन् पावसामध्ये शेतं गेली वाहून
प्रत्येक जागतिक नेता आपलं राजकारणच पाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
महाग महाग औषधं शेठ लोकांकरता खास
गरीब जनता भोंदुगिरीवर ठेवते मग विश्वास
पैसे नाहीत इस्पितळाचं देणं भरण्यापायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
देवाने सोपवलं जग माणसाच्या हातात
लाडक्या अपत्याने त्याच्या केला विश्वासघात
देवही म्हणतो आता मला शोधा तुमच्याच ठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥