होळी
डिसेंबर 17, 2021विद्ध
जानेवारी 3, 2022थोडं आणखीन ..
तुमच्याही बाबतीत असं होत असेल ना? म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आल्याचा मंद सुगंध
सुंदर दिसत होता रंग
म्हटलं थोडं आणखीन दुध घालू या
… आणि चहा दुधाळ झाला ॥
स्वयंपाकघरात नुसता घमघमाट
तोंडाला सुटले पाण्याचे पाट
म्हटलं थोडं आणखीन मीठ घालू या
… आणि रस्सा खारट झाला ॥
लोकांचे घसे बसले होते ओरडून
मी बोलरला काढलं होतं चोपून
म्हटलं थोडा आणखीन एक छक्का मारू या
… आणि बाउंड्रीवर कॅच गेला ॥
सहलीत चालली होती टिंगल-टवाळी
हसत होते सारे एकमेकांना देत टाळी
म्हटलं थोडा आणखीन विनोद करू या
… आणि समोरचा दुखावला गेला ॥
मैत्रीचं नातं असं घट्ट
संकटातही उभा राहायचा दत्त
म्हटलं थोडा आणखीन वाद घालू या
… आणि मित्र रुसून गेला ॥
पदोन्नतीकरता होती मुलाखत
यंदा माझाच चान्स होता दिसत
म्हटलं थोडा आणखीन मस्का लावू या
… आणि बॉसला राग आला ॥
मुलगा होता मेहनती बुद्धिमान
ठेवून होता आमचा मान
म्हटलं थोडा आणखीन सल्ला देऊ या
… आणि मुलगा दुरावला गेला ॥
मुलं आपल्या पायांवर उभी होती
भविष्याचीही चिंता नव्हती
म्हटलं थोडं आणखीन कमावून बघू या
… आणि हार्टअटॅक आला ॥
नातं जुळलं असं रेशमी
सुख-दुःखात एकत्र नेहमी
म्हटलं थोडं आणखीन गृहीत धरू या
… आणि नात्याला तडा गेला ॥
ही सवय करतेय घात
ह्याची गाठ बांधली मनात
म्हटलं ‘थोडं आणखीन’ बाजूला ठेवू या
… आणि आयुष्याचा गाडा रुळावर आला ॥