मोकळा वेळ
मार्च 26, 2023मुहूर्त
जुलै 22, 2023तुळस
सर्वांना पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा! विकासकामांसाठी शहरात झाडं तोडली तर प्रायश्चित्त म्हणून शेकडो किलोमीटर दूरच्या जंगलात दुप्पट संख्येने वृक्षारोपण करायचं ही मखलाशी मानवच करू जाणे. पण शहरांची भरभराट करायची म्हटलं की निसर्गाचा ऱ्हास आलाच, नाही का?!ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/l10HAP2v4g0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
उपनगरातली चाळ
दिवेलागणीनंतर टांगेवाला नकार द्यायचा
इतकी झाडी आजूबाजूला
चाळीच्या चौकात मातीचं अंगण
त्यात एक तुळशीवृंदावन
आणि त्यात… मी
एकदा एका हरणाने मला ओरबाडून खाल्लं होतं
होय… हरीण
ओ माय गॉड.. यू मीन ते जंगलात असतं ते!? … होय तेच
ऋतू आणि बदलणारा निसर्ग
चैत्र पालवी..
उन्हाळ्यातही गारवा, पावसाळ्यात झाडांचा आडोसा.. आणि हिवाळा? एकदम हिल स्टेशन
शांत… रेडिओ बंद असला तर फक्त पक्ष्यांचा
नाहीतर रातकिडे.. बस!
आवाज.. एक दिवस हादरवणारे आवाज
झाडं काड काड मोडल्याचा…
खडी आणणाऱ्या ट्रक्सचा…
रोडरोलरचा…
भर थंडीत आगीच्या हाळा
आणि उग्र वास… वितळणाऱ्या डांबराचा
नितळ काळाशार रस्ता
आणि दिसू लागली त्या रस्त्यापलीकडची शेतं
आणि ते काय?
काही दिवसांत एक छोटीशी इमारत..
आणि मग आणखीन एक..
आणि मग आणखीन एक..
आणखीन, आणखीन
अरे.. शेतं कुठे गेली?
मातीच्या अंगणात केवढी मजा
गोट्या, भोवरे, लगोरी, लंगडी, पकडापकडी, आंधळी कोशिंबीर, ताररुपी
दिवाळीत फटाके, किल्ले
माझाही मोठा थाट…
दर सणाला नैवेद्य, पूजा, रांगोळी, फुलांचा हार!
लागली दृष्ट
मातीच्या अंगणात चिखल होतो, गवत वाढतं, बिळं होतात
माती झाका… फरश्या लावा
फरश्या उखडल्या… मग सिमेंट कॉंक्रीट
पार्किंगला जागा नाही… ते वृंदावन कशाला?
एक सद्गृहस्थ… रात्री हळूच माझी उचलबांगडी
नवीन घर… डालडाचा डबा… टांगलेला… व्हरांड्यात
वाटलं… संपलं आपलं आयुष्य
पण नाही… उतरणीचा खूप काळ समोर होता
जंगल? ते काय असतं?
शेतं गेली… जंगल कुठलं राहायला!
मोठा रस्ता… वर्दळ
दुकानं…
एक गॅरेज.. एक खाटिक.. एक कबाडी.. एक सार्वजनिक शौचालय.. एका नेत्याचं ऑफिस..
रस्त्याच्या आश्रयाला एक कुटुंब.. अनेक कुटुबं.. आडोसे.. कच्च्या झोपड्या.. पक्क्या झोपड्या..
झोपड्याच झोपड्या!
मी अमर आहे का?
अंगण गेलं… मी आहेच
वृंदावन गेलं… मी आहेच
अहो डालडाचे डबे.. तेही गेले… मी आहेच
सात दशकं झाली
आणि ही चाळ तरी अमर आहे का?
तीन पिढ्या इथेच..
चौथी मात्र नाही..
शहरात… मोठे ब्लॉक्स
शिवाय सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका
पण चाळीची खोली… तशीच… कुलूप लावलेली
मोठी इमारत… मोठे पैसे… इथेच… कशाला सोडा?
हा आवाज कसला?
बुलडोजरचा…
नवीन घरं… बंदिस्त…
पण निसर्ग हवाच… बंद घरात… उन्हापावसाशिवाय वाढणारा
कॅक्टस, ॲलोवेरा, ऑक्सालिस, जेड
आणि हा डालडाचा डबा?
तो तर समोरचा कबाडीही नाही घेणार..
तो नक्कीच जाईल म्युन्सिपाल्टीच्या कचऱ्यात
माझ्यासकट!