कूस
फेब्रुवारी 7, 2021कवीराज
मार्च 21, 2021ती भेटली परंतु ..
आज प्रेमाचा उत्सवदिन आहे. त्या दिवशी गाडी चालवताना पाहिलं समोरच्या वाहनाच्या मागे लिहिलं होतं, ‘भेटली होती, पण नशिबात नव्हती’. इतक्या मोजक्या शब्दांत त्या वाहनाच्या मालकाने आपल्या मनातला एक ठसठसता कोपरा उघड केला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की अशा अडथळ्यांमुळे थांबलो तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तुमच्या बाबतीत आले होते का कधी असे अडथळे?ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/sLZcV2uqwKQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती
ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥
होतो लहान धाडस करण्यास नाही जमले
शिक्षिका होती माझी शाळेत छात्र नव्हती ॥
स्वप्नात घडली माझ्या अवतरली कॉलेजात
तिज सांगू इतुकी शक्ती मम काळजात नव्हती ॥
सहकर्मी वाट पाहे मी फक्त बोलण्याची
बोलेल शब्द ऐसी जिव्हा मुखात नव्हती ॥
खिडकीत त्या समोरील माझ्या मनीचे भाव
दावेल ऐसी खिडकी माझ्या घरात नव्हती ॥
एकीचे मुख उघडता वाचाच गेली माझी
भाषा तिची कळावी माझ्यात बात नव्हती ॥
उतरली आलिशान गाडीतूनी तिच्यावर
खर्चेन इतुकी रक्कम माझ्या खिशात नव्हती ॥
बागेत जाऊनिया म्हटले तिला विचारू
तिथली परंतु गर्दी माझ्या कह्यात नव्हती ॥
ती एक जिने होता केला पुढेही हात
माझ्या नियंत्रणात माझीच गात्रं नव्हती ॥
स्थळ पाहण्यास गेलो मैत्रीण पण मुलीची
गोडी तिच्यात होती ती त्या स्थळात नव्हती ॥
एकीच्या नयनी प्रीत पती पण उभा तिथेच
अर्थात माझी आता होण्यास पात्र नव्हती ॥
विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती
ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥