मुहूर्त
जुलै 22, 2023सहावं महाभूत
ऑक्टोबर 17, 2023डीपी
Whatsapp, Facebook वगैरे सामाजिक माध्यमांमुळे आपण सर्व एकमेकांच्या जवळ आलो आहोत हे वादातीत आहे. मात्र ह्या माध्यमांचा एक दोष म्हणजे त्यात जे काही दिसतं त्यामुळे आपण एका आभासी जगात राहायला लागलो आहोत. वास्तव अनेकदा धक्कादायक असतं ज्याकरता पण तयार नसतो..
गृहीत धरतो आपण आपल्या मित्रांना
गृहीत धरता येतं म्हणूनच तर ते आपले मित्र असतात
कोणी कुठे तर कोणी कुठे… देशाच्या… जगाच्या पाठीवर
सानिध्याची गरज नसते मित्र असण्याला
कित्येक दिवस फोनवर बोलणंही होत नाही
काही फरक पडत नाही
मेसेजेस मात्र सुरु असतात… कधी समूहावर… कधी वैयक्तिक
वाढदिवस… फॉरेन ट्रिप्स… दिवाळी शुभेच्छा ॥
मग येतो कुणाचातरी मेसेज.. अमेरिकेहून.. सिंगापूरहून.. दिल्लीवरून
मै आ रहा हूँ.. फलाना डेट को.. मिलते हैं
भेट.. हॉटेलात.. काही येतात.. काही कारणं देतात
मधला काळ जणू पुसला जातो
विषयांची कमतरता कधीच नसते
कुणाचं सुटलेलं पोट.. कुणाचं टक्कल
प्रोफेसर.. लफडी.. ती आता काय करते
मुलं.. यशाचा अभिमान.. दूर गेल्याची खंत
ऑफिसमधला खडूस बॉस.. कामाचे तास.. टेन्शन
हॉटेलमध्ये कलकलाट.. त्यातच आपलाही
शाब्दिक कोपरखळ्या.. गडगडाटी हास्य.. आणि सोबतीला विरामचिन्हांसारखा शिव्यांचा रतीब
संध्याकाळ कशी मस्त जाते
पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका..
परतीचा प्रवास.. दिवसभराचा शीण.. उद्या ऑफिस, बॉस, तास आणि टेन्शन! ॥
आणि एक दिवस अचानक बातमी येते.. त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय.. काही माहिती आहे का?
हॉस्पिटलमध्ये? कशाकरता?!
हार्टॲटॅक.. आयसीयूमध्ये आहे
वाट पाहू या.. काही खबर मिळते का.. नाहीतर जाऊ या भेटायला
पण दोन दिवसांनी कळतं.. सारं काही संपलं! खेळ खलास!!
खलास?! असा कसा खलास?
आता तर भेटला होता.. कधी बरं.. जाम आठवत नाही
खरंच.. गेल्या दोन वेळेला तो आलाच नव्हता
पण इतका आजारी होता?
व्हॉट्सॲप, फेसबुकच्या मुलामा दिलेल्या विश्वात त्याचं आजारपण आपल्याला ठाऊकच नसतं ॥
आपण पाहत असतो त्याचा डीपी
बायको-मुलांबरोबरचा.. हसरा.. चौकोनी आनंदी, सुखी कुटुंब!
तो डीपी.. ती बातमी.. सांगडच बसत नाही
आठवतो तो शेवटच्या वेळी घेतलेला निरोप.. अपूर्ण
टॅक्सी बुक करताना..
गाडीतून वाकून हात हलवणारा तो.. त्याचा चेहरा
काय म्हणाला होता? काय म्हणाला असेल?
चल बाय.. भेटू या.. नक्की.. लवकरच!
मन बजावतं हे बरोबर नाही झालं.. आणि आयुष्याची वहिवाट पुन्हा.. तशीच ॥
एक दिवस व्हॉट्सॲपवर कोणाचं नाव सर्च करत असतो आपण
पोटात डुचमळतं.. मन खिन्न
त्याचा डीपी.. पूर्वसूचना न देता.. स्क्रीनवर
त्याचं ते आपल्या फोनवर राहिलेलं अकाउंट.. डिलीट करायला न धजावलेलं आपलं मन
काही वेळ त्या चेहऱ्यावर नजर रेंगाळते.. आणि मग ‘बॅक की’
फोनमधल्या व्हॉट्सॲपवरील अनंत अकाउंट्सच्या तळाला जातो तो डीपी
हसरा.. आनंदी! ॥