लाट
जुलै 17, 2021प्रतिज्ञा
ऑगस्ट 14, 2021जेवण
गेल्या काही महिन्यांत मध्यमवर्गीय पुरुषांना घरातील स्त्रीचं महत्त्व काही प्रमाणात समजू लागलं आहे. अनेक पुरुष घरातील स्त्रीला चक्क घरकामात मदत करू लागले आहेत. त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेताना ते अजिबात दमत नाहीत. मात्र संसारात बुडून गेलेल्या ह्या स्त्रीच्या आयुष्यातील काही अगदी साध्या साध्या अपेक्षा समजून घेऊन पूर्ण करण्यात आपण पुरुष खरच यशस्वी झालो आहोत का?!ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/YAvi8iAzEjM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
लग्नानंतर त्याच्या कारकीर्दीचा आलेख चढत गेला वरवर
तिच्या कारकीर्दीचा विषय आता राहिला फक्त जरतर
झोकून दिलं तिने स्वतःला आपल्या सुखी त्या संसारात
आधी दोघांच्या मग तिघांच्या आणि मग चौघांच्या त्या विश्वात
त्याच्या कमाईतच त्यांचं सुख होतं तिला सतत होती जाण
मग ती आपल्या दोन मुलांच्या विश्वातच झाली रममाण
त्याला मिळाला कुटुंबप्रमुख, अनभिषिक्त राजाचा मान
तिने स्वीकारलं कुटुंबातील तिचं दुय्यम स्थान
कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा म्हणून आपण राहावं
तिची एकच अपेक्षा होती, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं ॥
चढत्या आलेखाबरोबर त्याचं विश्व गेलं विस्तारत
चांगला बाप, चांगला नवरा म्हणून आपलं कर्तव्य मात्र तो चोख होता बजावत
इकडे मुलांना स्वतःची स्वतंत्र विश्वं सापडली हळूहळू
त्यांचं बालपण तिच्या हातातून सांडून गेलं जशी समुद्रावरची वाळू
तिच्या वाढदिवसाच्या भेटवस्तूची किंमत त्याच्या प्रेमाचं परिमाण ठरत होती
तिचा पदर धरून राहणारी मुलं आता तिच्या प्रश्नांना फक्त हुंकार भरत होती
त्याचं घरी काम करणं, टीवी बघणं किंवा घरीच नसणं
मुलांचा अभ्यास, मित्र, कॉम्प्युटर … आणि फक्त फोनवर बोलतानाच हसणं
तिचं असं म्हणणं कधीच नव्हतं की त्यांनी तिच्याभोवती फेर धरून नाचावं
तिची एकच अपेक्षा होती रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं ॥
अपेक्षाभंगाचं दुःख स्वीकारत असताना अचानक एक विश्वव्यापी संकट आलं
तिच्या कुटुंबीयांचं घराबाहेर जाणंच बंद झालं
टाळेबंदीचा धक्का ओसरल्यावर तिला दिसली एक संधी चांगली
मोठ्या उत्साहाने ती स्वयंपाक करायला लागली
रात्री टेबलावर ताटं वाढून तिने सर्वांना जेवायला बोलावलं
जेवताना चाललेल्या गोष्टी, थट्टा, विनोद ऐकून तिचं मन अगदी भरून आलं
तिला वाटलं तिच्या त्या एकमेव अपेक्षेमागचा भाव आता सर्वांना असेल समजला
पण हाय! तेरड्याचा तो रंग, तीन दिवसांतच ओसरला
पुन्हा रात्री एकटीनेच जेवताना तिला अश्रूंना लागतं परतवावं
फार नाही… तिची एकच अपेक्षा होती रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं ॥