रडू
ऑक्टोबर 10, 2020केस
ऑक्टोबर 30, 2020जगपंचायत
आज राष्ट्रसंघ दिवस आहे. ग्लोबल विलेज किंवा वैश्विक गावाची संकल्पना स्वीकारली तर राष्ट्रसंघ म्हणजे त्या गावची ग्रामपंचायत ठरतं. आता ग्रामपंचायत म्हटली की गावातील लोकांचे हेवेदावे, भांडणं, रुसवे-फुगवे ह्या साऱ्याचं प्रतिबिंब त्यात पडणारच. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या राष्ट्रांना सुचलेलं शहाणपण असलेली राष्ट्रसंघ नावाची ही जगपंचायतही शीतयुद्ध, अखाती युद्ध, कोरियन युद्ध, अमेरिका-चीन वाद असे अनेक तंटे सहन करत कशीबशी काम करत राहिली आहे.ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hqqxYRbcLXY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
येका आगळ्यायेगळ्या गावचा न्यारा व्हता ढंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ धृ ॥
आटपाट ब्रह्मांडात येक न्यारं व्हतं गाव
निळ्या निळ्या त्या गावाचं प्रिथवी व्हतं नाव
गाव मोठं सुरेख त्याचं पानी लई लई ग्वाड
पन गावातील त्या मानसं व्हती येकाहून येक द्वाड
येगळ्या येगळ्या दिशेस होती त्या समद्यांची तोंडं
लाथाळ्या अन् तंटे करती जशे गावगुंड
येकदा मोठा राडा झाला असा वाटे धाक
निम्म्याहून जास्त घरं झाली बेचिराख
गावकरी मग जमले सारे बांधला त्यांनी चंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ १ ॥
सदस्य व्हावं कुनी ह्याची चर्चा झाली मोठी
गावातील त्या निम्मी जन्ता अजून गुलाम व्हती
सारे जमले लोकशाहीची मंजुळ गानी गात
बोलाचीच कढी व्हती बोलाचाच भात
दोन गटांमदी झाली अश्शी रस्सीखेच
वाटून खाऊ कळलं त्यांना तवा सुटला पेच
आम्हीच पंचायत चालवनार म्हनती पाच टगे
घाबरून त्यांना हुबे होते बाकी नुसतेच बघे
पंचायतीच्या सुरुवातीलाच रंगाचा बेरंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ २ ॥
पंचायतीतील दोन टगे मग अस्से लागले भांडू
दहशत अश्शी वाटं कधीही रक्त लागंल सांडू
रात्रीसुद्धा गाव सारं राहू लागलं जागं
काही गेले ह्याच्या मागं काही त्याच्या मागं
लक्ष ठेवती सारे आपल्या शस्त्रांच्या साठ्यावर
सारं गावच नाशाच्या मग ठाकलं उंबरठ्यावर
पाच टगे ते जास्त जास्त शस्त्रांचा साठा करती
आनी कुनीही भांडू नका सांगत गावामदून फिरती
पाच टगे ते सुखी होती पन बाकी सारे तंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ ३ ॥
दोघांमधला येक टगा पन हळूहळू गेला थकत
दुसरा टगा म्हनतो आता माझा आला वखत
आपल्या टोळीस म्हनला चला बाकीच्यांना धोपटू
तिसरा एक टगा तिथे पन दंड लागला थोपटू
दुसरा टगा जाऊन तिसरा आला त्या ठिकानी
दोघं म्हनतात एकमेकांला पाजीन तुला पानी
गीता वाचून उपेग काय कारभार असला भोंगळ
सारे म्हनती ह्याहून बरा होता कालचा गोंधळ
जगपंचायत कसली ही तर पंचायत भणंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ ४ ॥
येका आगळ्यायेगळ्या गावचा न्यारा होता ढंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ धृ ॥