देव
मे 23, 2022… अडलं नाही बुवा
डिसेंबर 18, 2022छेड
आज आंतरराष्ट्रीय स्त्रियांवरील अत्याचार विरोधी दिवस आहे. स्त्रीच्या नकारातच होकार दडलेला असतो वगैरे भंपक कल्पनांना पुरुषप्रधान समाज नेहमीच खतपाणी घालत आला आहे. स्त्रियांची छेड काढणं ह्यात स्त्रियांनाही आनंद मिळतो असले पुरुषांनी करून घेतलेले गोड गैरसमज किती अवाजवी आहेत हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळेल ..ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/4FLpIxG9bac ह्या ठिकाणी ऐकता येईल.
छोटंसं ते स्टेशन होतं
झाला होता उशीर
गाडी यायला वेळ होता
निघत नव्हता धीर ॥
छोटीशी पण स्वच्छ होती
तिथली वेटिंगरूम
कोणीच नव्हतं आत सगळी
होती सामसूम ॥
थोडाच वेळ झाला असेल
बसलो होतो वाचत
दोघे जण आत आले
सामान आपलं सावरत ॥
एक होती बाई मध्यमवयीन
देखणी छान
सुडौल होता बांधा आणि
कांती गोरीपान ॥
पुरूष चारचौघांसारखा
निटनेटका असा
खासगी कंपनीमधला कोणी
मॅनेजर जसा ॥
थोड्याच वेळात तेही दोघं
झाले स्थिरस्थावर
जुजबी बोलणं सुरू झालं
भीड चेपल्यावर ॥
तोही लागला बोलू आणि
तीही झाली बोलकी
एकमेकांसाठी तेही होते
अनोळखी ॥
बोलायला ती मोकळी होती
बोले भरभरून
गप्पाटप्पा साध्या तरीही
विषयाला धरून ॥
बोलता बोलता लक्ष जेव्हा
नव्हतं माझ्याकडे
नजर माझी जात होती
गोऱ्या गळ्याकडे ॥
आकर्षक ती होती मला
भावली होती फार
तिसरं कोणी नसतं आली
असती मग बहार ॥
बोलत होता तोही चेहरा
करून आपला लंपट
बोलणं त्याचं ऐकून माझा
संयम होता संपत ॥
प्रतिस्पर्धी होता झाला
नसता तो कबूल
पाहून त्याला उठत होता
माझा मस्तकशूळ ॥
समजून चुकली तीही बहुधा
बोले माझी नजर
टाळू लागली मला आणि
सावरू लागली पदर ॥
झाला असता स्पर्श माझा
चुकार तो सवंग
सावरून बसली ती आपलं
चोरून घेतलं अंग ॥
ठाऊक होता खेळ मला
जाणार नव्हतो हार
आयुष्यातील माझ्या नव्हती
पहिली ही शिकार ॥
त्याची मात्र सुरूच होती
असंबद्ध बडबड
लोचटपणे हसत होता
चेहरा होता बेरड ॥
मध्येच उठून आत गेली
हात धुवायला
माझी पुढची चाल मीही
लागलो ठरवायला ॥
सरकला तो माझ्याजवळ
माझ्याही नकळत
हातावरती हात ठेवला
ओशाळवाणं हसत ॥
काय चाललंय समजायलही
लागले दोन क्षण
किळसवाण्या जाणीवेने
भरला कणन् कण ॥
स्पर्शाची त्या ओळख पटली
अर्थ होता सरळ
झटकला मी हात शहारून
चढलं जसं झुरळ ॥
उठलो तिथून तडक सामान
लागलो माझं आवरू
धक्क्यातून त्या मन माझं
शकत नव्हतं सावरू ॥
खोलीत होतो फिरत मनात
पेटली होती आग
नजर त्याची करत होती
पण माझा पाठलाग ॥
कधी बाहेर येऊन बसली
समजलंही नाही
चित्त नव्हतं थाऱ्यावरती
सुचत नव्हतं काही ॥
काय वाटत असेल तिला
झाला साक्षात्कार
शिकाऱ्याचीच होत होती
पाहा आज शिकार ॥
वासनेचे बटबटीत असे
पाहून रंग भडक
गाडी येता माझी तिथून
निघून गेलो तडक ॥
आजही सुंदर नारी दिसता
घसरे माझं मन
प्रसंग आठवून त्या दिसाचा
आवरतो मी पण ॥
पुरूषी अहंकाराचीही होते
परतफेड
पुरूषांचीही कधी काढली
जाऊ शकते छेड ॥