भारत रत्न खान अब्दुल गफार खान
जानेवारी 18, 2022प्रेमात पडल्यावर काय होतं
फेब्रुवारी 14, 2022चांगलं तेवढं घ्यावं
निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं ..माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ धृ ॥
हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ १ ॥
शतकानुशतकं अचल उभे ठाकलेले आहेत पर्वत
खाचखळग्यांची दमवून टाकणारी निबिड वाट अंगावर मिरवत
आपण माथ्यावरून दिसणारं विहंगम दृष्य डोळ्यांत साठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ २ ॥
वादळात घरं संसार होतात उद्ध्वस्त
सागरपृष्ठी गलबतं नौका होतात क्षतिग्रस्त
आपण वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे उष्म्याला शीतल करावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ३ ॥
गावा शहरांची वाताहात होते जेव्हा अतिवृष्टीमुळे पूर येतो नदीला
कुटुंबंच्या कुटुंबं लागतात देशोधडीला
आपण तहाननेनं व्याकूळलेल्या जीवांना जीवन पाजावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ४ ॥
मृत्यूला कारणीभूत ठरतो उष्माघात
प्रखर किरणांनी शेतंच्या शेतं जळून जातात एकजात
आपण अंधाऱ्या आयुष्यांना प्रकाश दाखवण्याचं कार्य करावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ५ ॥
विज्ञानाने दिलेल्या अस्त्रांमुळे झाला विद्धंस
अत्याचार झाले अगणित नृशंस
आपण विज्ञानानेच आरोग्याचं आंदण दिलं हे का विसरावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ६ ॥
आईवडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ७ ॥
महामानवांच्या हातूनही चुका होत असतात
महा असले तरी तेही मानवच असतात
रामाकडून संयम घ्यावा
कृष्णाकडून कर्म करत राहण्याचा उपदेश घ्यावा
बुद्धाकडून शांती घ्यावी
महंमदाकडून मैत्री घ्यावी
ख्रिस्ताकडून हळवं मन घ्यावं
झरतृष्टाकडून पराक्रमी मनगट घ्यावं
ज्ञानेश्वरांकडून जगत्कल्याणाचं सूत्र घ्यावं
रामदासांकडून मनाला आवर घालण्याचं कसब घ्यावं
चाणक्याकडून चातुर्य घ्यावं
शिवबाकडून सर्वजनसुखाचं बाळकडू घ्यावं
लोकमान्यांकडून स्वाभिमानाचं शिक्षण घ्यावं
बापूंकडून अहिंसेचं व्रत घ्यावं
सावरकरांकडून जाज्वल्य देशप्रेम घ्यावं
चाचा नेहरूंकडून भविष्याचं स्वप्न घ्यावं
महामानवांच्या चुका पाहून विचलित होऊ शकतं चित्त
पण म्हणून त्यांचे चांगले विचार आचरणात न आणणं हे केवळ एक निमित्त
ह्याकरताच आपण त्यांच्या गुणांचा विचार करणं का सोडावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥ ८ ॥