… गोष्टी काही काही
मे 21, 2019दान
ऑगस्ट 13, 2019गुर
सर्व डॉक्टर आणि त्यांच्या पेशंटांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा! बदलत्या जीवनशैलीबरोबर जीवनातील डॉक्टरांचं महत्त्व वाढत चाललं आहे. रक्तदाब, कर्करोग, मानसिक तणाव अशा आदिमानवांना ठाऊकही नसलेल्या रोगांनी आपण ग्रासत चाललो आहोत. माणूस बनून जगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला त्रास कमी होऊ शकेल पण आपल्यातील ‘गुरा’ला माणूस माणसाळवू शकेल का?
एक होतं शहर तिथे डॉक्टर एक होता
पेशंट आला तिथे शोधत शोधत त्याचा पत्ता
म्हणतो फार लांबून आलो इलाज माझा करा
मागाल तेवढे पैसे देतो काढून तुम्हा आत्ता
डॉक्टर म्हणतो समोर आहे डॉक्टर तो माणसांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ १ ॥
डॉक्टरसाहेब तुमच्याकडेच होईल माझं काम
म्हटलं ना मी मोजीन तुम्ही सांगाल तेवढं दाम
तुम्हीच इलाज कराल माझा आहे माझी खात्री
आयुष्यात राहिला नाही माझ्या काही राम
डॉक्टर म्हणतो करू नको रे खोळंबा कामांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ २ ॥
ऐकून तरी घ्या डॉक्टर माझी तुम्ही कथा
आपसुक कळून चुकेल तुम्हा काय माझी व्यथा
उठतो जणू मधमाशी मी जातो कामावरती
लोकलमध्ये शिरतो जसा मेंढ्यांचा तो जथा
सांगू नकोस मजला तुझा प्रपंच पण दिवसांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ ३ ॥
ऑफिसमध्ये काम करतो जसा कुणी गाढव
घोड्यासारखा पळतो तरी सेल्स म्हणतात वाढव
कस्टमरसमोर पोपटासारखा बोलतो घडाघडा
साहेबासमोर अस्वल बनून म्हणतो मला नाचव
थांग लागतो आहे मजला तुझ्या विचारांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ ४ ॥
बायको म्हणते आईपुढचा नंदीबैल तू सुंदर
आई म्हणते बायकोच्या तू ताटाखालचं मांजर
आवाज चढला वडिलांचा तर होते माझी शेळी
मुलांशी खेळताना मात करतो मी माकडांवर
केस कळली तुझी पाढा मोठा तो रोगांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ ५ ॥
ठाऊक नव्हतं मजला अरे मोठं तुझं शहर
मोठ्या शहरांमध्ये असाच माजला आहे कहर
तुझ्यासारखे कित्येक पेशंट रोज येतात इथे
काढून घेण्या आपल्या आपल्या आयुष्यातील जहर
होईल माझ्याकडेच अंत तुझ्या ह्या दु:खांचा
भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥ ६ ॥