शेपटी
नोव्हेंबर 14, 2018सणावली
एप्रिल 6, 2019गुपित
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. मात्र लग्न होऊन बरीच वर्षं झालेल्या अनेक जोडप्यांना – विशेषतः पुरुषांना – आजच्या दिवशी नक्की कसं वागावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. खरं तर प्रेमाला स्थल-कालाप्रमाणे वयाचंही बंधन नसतं. त्यामुळे बावरून जाऊ नका. प्रणयाच्या खेळात तुमची जुनीजाणती सहचारिणीही तुम्हाला चकित करू शकते…
चार दिसांनी फिरून येशील
परगावाहून आज खरा
वाट पाहती वाटेवरती
आसुसलेल्या ह्या नजरा
मीलन घटिका समीप आली
आज उशीर रे करू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ १ ॥
परगावी तू जाण्याआधी
गडबडीत दिन ते गेले
कधी तयारी माझी नव्हती
कधी घरी अतिथी आले
जातानाचे नजरेमधले
भाव तुझे विस्मरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ २ ॥
वडीलधारे कोणी नाहीत
मुलेही आज घरी नसती
एकांताचे दंश मला बघ
पदोपदी शरीरी डसती
विरह भंगण्या लवकर ये रे
ताणून आणखीन धरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ ३ ॥
माळून गजरे केशांमध्ये
तुझ्याचसाठी मी नटले
धुंद सुगंधी शयनगृहही
तुझ्याचसाठी ते सजले
पुन्हा भाळशील माझ्यावरती
दीप आज मालवू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ ४ ॥
नवतारूण्याचे दिन आपुले
सरून गेले जरी असती
माझ्याकरता मदन आज तू
तुझ्यासाठी मी आज रती
उधळू देत मनाला चौखूर
आज मला सावरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ ५ ॥
मोहरते मी विचार करता
तीव्र मनामधले स्पंदन
झुगारली मी लज्जा सारी
आज नाही कसले बंधन
उधाण घेऊन तूही ये रे
आज मना आवरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥ ६ ॥