बावळट
नोव्हेंबर 1, 2024चविताक
जानेवारी 4, 2025खिडकी
शहरांच्या पसरण्याला एक सीमा असते. ही सीमा गाठली की मग शहरं उंचीने वाढू लागतात. दहा, तीस, सत्तर मजली इमारती. आणि मग अश्या इमारतीतील घराच्या खिडकीतून दिसतात त्या फक्त इतर खिडक्या. भावनाविरहीत, व्यक्तीनिरपेक्ष, भौमितीय खिडक्या..
नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले
आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥
आयुष्यभर शिदोरी जमवून घर मिळाले
ते कष्ट दो जिवांचे खिडकीत नाही दिसले ॥
परदेशी पुत्र आपुल्या मातापित्यास विसरी
कारुण्य जोडप्याचे खिडकीत नाही दिसले ॥
पती एक तो सुशिक्षित पत्नीस रोज मारी
स्त्रीचे परंतु कुढणे खिडकीत नाही दिसले ॥
दशकभराची प्रतीक्षा संपून बाळ जन्मे
चेहरे आनंदलेले खिडकीत नाही दिसले ॥
मिळता नकार त्याला भंगून हृदय गेले
झुरणे ते होत हळवे खिडकीत नाही दिसले ॥
अभ्यास खूप केला गुण चांगले मिळाले
आनंदी नाचणे पण खिडकीत नाही दिसले ॥
पाहती वाट सारे सैन्यातल्या पित्याची
डोळे आसुसलेले खिडकीत नाही दिसले ॥
दिसतात खिडकीमधूनी ऐश्या अनंत खिडक्या
प्रत्येक भिन्न जग ते खिडकीत नाही दिसले ॥
ज्याच्या घरात त्याचे ब्रह्माण्ड ते सुरक्षित
उपऱ्या कधी कुणाला खिडकीत नाही दिसले ॥
माझीही ही इमारत माझीही एक खिडकी
त्यांनाही काही माझे खिडकीत नाही दिसले ॥
नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले
आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥