जगपंचायत
ऑक्टोबर 24, 2020विसात नव्वद शोधू नको
नोव्हेंबर 8, 2020केस
कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी संपून केशकर्तनालयं पुन्हा सुरु होईपर्यंत सुरक्षित अंतर राखण्याचा नियम असा काही अंगवळणी पडला होता की एखादी परकी व्यक्ती आपल्या शरीराच्या इतक्या जवळ घिरट्या घालते आहे हा विचारही अशक्य वाटू लागला. तरी काही जणांनी धोका पत्करण्याचा निर्णय घेतला, काही जणांनी घरातल्यांकडून केस कापून घेण्याचा निर्णय घेतला. पण निर्णय न घेणं हाही एक निर्णय असू शकतो. मी तेच केलं …ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/vl5jkNJqBUU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आधी कपाळ मग नाक मग हनुवटीची ओलांडली वेस
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ धृ ॥
कोरोनाच्या साथीनं जगभरात माजवला कहर
आणि इकडे माझ्या डोक्याच्या बगिच्याला लवकरच आला बहर
कुत्सित मित्र म्हणतात कुणाचं काय तर कुणाचं काय
ठणकावतो मी त्यांना, ज्याच्याकडे असते चादर तोच पसरतो पाय
ह्या वयात त्यातील बऱ्याच जणांच्या डोक्यावर केसाचा नाही लवलेश
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ १ ॥
लहानपणी डोक्यावर हजामतीची नियमित घडत असे सेवा
पण मित्रांचे वाढवलेले केस बघून मला वाटत असे हेवा
मार खात असत शिक्षकांचा पण लावत नसत केसाला कातरी
तेच होते माझे बालपणीचे शूरवीर हीरो माझी पक्की होती खातरी
आम्ही ‘शहाणी मुलं’ वरवर म्हणायचो अशा मुलांना गॉन केस
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ २ ॥
पातळ साबण म्हणजे शँम्पू एवढंच ठाऊक होतं समीकरण
त्यावर कंडिशनर म्हणून नवीनच समजलं प्रकरण
बायकोने मनाविरुद्धच ह्या केशज्ञानात भर घातली
आता संपवतोय रोज ह्याची ना त्याची बाटलीमागून बाटली
मग आरशासमोर बटा उडवून सरकवतो कपाळावरील केसांची रेष
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ ३ ॥
हेअरब्रश, हेअरबँड, हेअरबोने भरलं आहे बाथरूममधील कपाट
पुढे तिपेडी वेणी घालून बघण्याचा घातला आहे घाट
वाटलं होतं बायको मला बघून म्हणेल ‘उडे जब जब झुल्फे तेरी’
पण माझे विचार ऐकून बायकोला आली घेरी
एक मोठं गाठोडं घेऊन आली म्हणाली ‘घे ह्या साड्याही नेस’
तिला म्हटलं जरा हस ना …
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ ४ ॥
आधी कपाळ मग नाक मग हनुवटीची ओलांडली वेस
आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ धृ ॥