माझाच देव महान
जानेवारी 17, 2021ती भेटली परंतु ..
फेब्रुवारी 14, 2021कूस
लहान असण्याचे दोन फायदे असतात. एक म्हणजे लहानपणी भावना व्यक्त करायला कोणतीही आडकाठी नसते – आनंद झाला हसा, दुःख झालं रडा. दुसरं म्हणजे दिवसाच्या शेवटी आपल्या साऱ्या भावना बाजूला ठेवून अगदी सुरक्षित वाटेल अशी त्यांची एक हक्काची जागा असते. आईची कूस! दुर्दैवाने मोठ्यांचं तसं नसतं ..ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Ofdfzk4rh7w ह्या ठिकाणी ऐकता येईल.
झोपली होती आईच्या कुशीत चेहऱ्यावर भाव भोळे
झोपल्यावरही दिसून येत होते रडून सुजलेले डोळे ॥
दु:खाची परिसीमा आज तिच्या मनात दाटली होती
तिची लाडकी बाहुली आज आम्ही देऊन टाकली होती ॥
अगदी कालपरवापर्यंत होती त्या बाहुलीला घेऊन झोपायची सवय
बाहुली असली की जणू मिळायचं रात्रीच्या अंधारापासून अभय ॥
काल कपाटातून काढलं तिला स्वच्छ करण्यापुरतं
तिला पाहून हिला आलं आनंदाचं भरतं ॥
म्हटलं आता ही देऊन टाकू या तू झालीस आता मोठी
लगेच चेहरा पडला तिच्या ढवळून आलं पोटी ॥
समजूत काढून तिला म्हटलं चल गाडीत बस
बसली गाडीत मुकाट्याने पण चेहरा तिचा निरस ॥
गाडी थांबवून एके ठिकाणी मी खुणेनेच बोलावलं खाली करून काच
फुटपाथवर एक कुटुंब राहत होतं ज्यात मुलं होती पाच ॥
गाडीतून काढलेल्या पिशव्यांभोवती जमली ती मुलं आणि त्यांची माउली
पिशव्यांमध्ये स्वच्छ कपडे, काही खाण्याचे पदार्थ आणि होती ती एक बाहुली ॥
पिशव्या घेऊन पटापट ती मुलं झाली पसार
वेळच नाही मिळाला करायला तिच्या मनाचा विचार ॥
सिग्नलला गाडी थांबली ती बघत होती मान करून तिरकी
त्यापैकी लहान मुलीने बाहुलीचे हात धरून घेतली आनंदाने एक गिरकी ॥
पाहून आपल्या दोन्ही हातांनी ती डोळे लागली पुसू
रडू आवरत नव्हतं पण पसरलं होतं चेहऱ्यावर हसू ॥
अगं बाहुलीच ती कधीतरी जाण्याकरताच आपल्याकडे येते
आठवणी मागे ठेवून आपल्या आयुष्याचा एक हिस्साच आपल्या बरोबर नेते ॥
तूही अशीच जाशील तेव्हा मी असेन तुझ्या आईचे डोळे पुशीत
पण मला सांग तेव्हा माझं तोंड मी लपवू कोणाच्या कुशीत ॥