सट्टा
जुलै 6, 2012टेलीविजन
मे 17, 2013स्वप्नं
स्वप्नं दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची स्वप्नं असतात शक्यतेच्या चौकटीत बसणारी … जी पूर्ण करण्याकरता कष्ट करावे लागतात. दुसऱ्या प्रकारची स्वप्नं मात्र भव्य, उदात्त असतात ज्यांना शक्यतेची चौकटच अमान्य असते. रणजी खेळणाऱ्या खेळाडूने कसोटी सामन्यांत खेळण्याचं स्वप्न बघणं हे झालं पहिल्या प्रकारचं. तर घरातच आरशासमोर उभं राहून आपणच शोएब अख्तरला मारलेल्या सिक्सरचं धावतं समालोचन टोनी ग्रेगच्या आवाजात करणं हे दुसऱ्या प्रकारचं. चंदू आणि बंडूची स्वप्नं कोणत्या प्रकारात मोडतात ते तुम्हीच ठरवा …
एक स्वप्न डोळ्यात असतं
पूर्ण करण्यासाठी
एक स्वप्न डोळ्यात असतं
मन रमविण्यासाठी
पहिल्या स्वप्नाकरिता लागे
मनातील ती जिद्द
दुसरं स्वप्न पाळत नाही
मनाचीही अन् हद्द
स्वप्नांसाठी जरूरी आहे विचार मनात जपणं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || १ ||
चंदू आणि बंडूचीही
आपली स्वप्नं होती
घर लहान माणसं फार
परिस्थितीच होती
चंदू म्हणे घ्यायचा आहे
फ्लॅट एक चांगला
बंडू म्हणे चंद्रावरच
बांधीन मी एक बंगला
चंदू सतत काळजीत बंडू आनंदात मग्न
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || २ ||
सणवारी चंदूकडे
शिकरण आणि पोळी
बंडू मात्र मनापासून
खायचा पुरणपोळी
ओवरटाइम मिळतो म्हणून
चंदू रोज लेट
बंडू मुलांसंगे खेळे
रोज रोज क्रिकेट
बंडूला उमगलंच नाही चंदूचं हे खपणं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ३ ||
बचत किती झाली चंदू
काळजी करे सतत
बंडू द्यायचा अडीअडचणीत
कोणालाही मदत
चिक्कू कंजूस अशी नावं
चंदूला शेलकी
कोजागिरीला बंडूकाका
पैसे देर्इलच की
बंडूचं वागणं चंदूला शक्यच नव्हतं पटणं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ४ ||
बघता बघता वर्षं गेली
सुदिन तो आला
चंदूचा आपल्या मालकीचा
फ्लॅट बुक झाला
स्वप्नपूर्तीचा हर्ष मानसी
झाला चंदूला
सर्वात आधी पेढे त्याने
दिधले बंडूला
चंदूच्या मनीचा आनंद शक्यच नव्हता लपणं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ५ ||
चाळ कधी जर दिसली आता
मनी म्हणे चंदू
विचार मजसारखा करूनिया
होर्इल सुखी बंडू
आजही चंद्रावरील बंगल्यात
सुखी असे बंडू
केली आजवर बचत फेडीतो
हप्ते अन् चंदू
कुणी ठरवावं सुखात आहे जास्त कुणाचं जगणं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ६ ||
दु:ख अपेक्षाभंगाचं ते
चंदूच्या स्वप्नात
पण स्वप्नपूर्तीची नशाही असते
चंदूच्या स्वप्नात
बंडूसारखी स्वप्नं कधीच
शक्य होत नसतात
पण मुळात सुखी असणार्याचीच
स्वप्नं अशी असतात
स्वप्नात शोधणं सुख किंवा सुखात बघणं स्वप्नं
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं || ७ ||