बी पी
जानेवारी 4, 2012स्वप्नं
मार्च 15, 2013सट्टा
सट्टाबाजारात नक्की काय होतं ते तुमच्यापैकी किती जणांना सांगता येईल? बहुतेक कोणालाच नाही. सट्टाबाजाराच्या चढ उतारांचं भाकीत करणारे हवामान खात्यातील ‘तज्ज्ञां’इतकेच ज्ञानी असतात असा अनुभव आपल्याला येतो. सट्टाबाजारात नेहेमी सर्वसामान्यांचीच ससेहोलपट का होते हे सांगणारी एक मार्मिक ई-मेल मला एका मित्राने पाठवली होती. त्यावर आधारित ही कविता ‘सट्टा’.
एक गाव होतं छान
नाही मोठं नाही सान
देवाजीचं होतं ध्यान
जणू नेहमी गावाकडे
गावाभोवती मोठं रान
त्यातील हिरवं प्रत्येक पान
होते पक्षी छान छान
आणि होती काही माकडे || १ ||
गावी व्यापारी एक आला
गोळा करतो प्रत्येकाला
लक्ष द्या सर्वांस म्हणाला
काय सांगे मी त्याकडे
फिरतो मी तर व्यापाराला
वस्तू विकेल ती विकण्याला
शहरी हवीत गिऱ्हाईकाला
मोठ्या प्रमाणात माकडे || २ ||
संधी चालून आली पाहा
माकडामागे रूपये दहा
राहीन दिवस फक्त मी सहा
दामही मोजीन पण रोकडे
गावी गोंधळ झाला महा
नाही जेवण नाही चहा
मोका नामी हा तर अहा
जो तो पकडतो माकडे || ३ ||
कोणी धरून आणली अकरा
कोणी सांगे माझी पंधरा
कोणी दाखवितो अन् सतरा
वीसही होती कोणाकडे
व्यापारी शब्दाचा खरा
विलंब नाही लावत जरा
पैसेही देर्इ भरभरा
मोजून घेता ती माकडे || ४ ||
व्यापारी सांगे झटपट
आणखीन आणून द्या मर्कट
पैसे देर्इन मी दुप्पट
लवकर परतीन तुम्हाकडे
रानी आले हो संकट
साऱ्या कपिंची फरफट
आबालवॄद्ध ते सरसकट
जाऊन पकडती माकडे || ५ ||
सांगितल्याप्रमाणे आला
फिरूनी व्यापारी गावाला
कमतरता नाही पैशाला
थोडीशीही त्याच्याकडे
उत्सव तेथ साजरा झाला
दुप्पट किंमत ज्याला त्याला
दुवा देती व्यापाऱ्याला
विकून ते सारी माकडे || ६ ||
व्यापारी तो त्यांना सांगे
पुन्हा येर्इन परतून मागे
दामही मिळेल एकामागे
रूपये पन्नास फाकडे
जनसमुदाय घार्इने पांगे
दिवसा आणि रात्रीही जागे
चिडून जाती परंतु रागे
रानी संपली माकडे || ७ ||
संपून गेली सारी बहुतेक
उपाय केले किती अनेक
देवाला कुणी करी अभिषेक
तर कुणी घालतो साकडे
वाटसरू दुसरा कुणी एक
चेहेऱ्यावरून वाटतो नेक
म्हणतो करत नाही अतिरेक
अहो विकतो मी माकडे || ८ ||
म्हणतो किंमत जरी चाळीस
तुम्ही द्या मजला पस्तीस
करू नका हो घासाघीस
जायचे आहे शहराकडे
लोक म्हणाले त्या व्यक्तीस
दे रे आम्हास तुझे कपिश
गुंतवू पैसे काही दिस
सांभाळू अन् ही माकडे || ९ ||
पैसे मोजून मग थाटात
देऊन मर्कट त्यां हातांत
वाटसरूने धरली वाट
नाही बघता कोणाकडे
पाहतात गावकरी वाट
कधी ये व्यापारी गावात
हळूहळू लागत गेली वाट
सांभाळूनीया ती माकडे || १० ||
व्यापाऱ्याचा नाही पत्ता
महाग पडला त्यांना सट्टा
गमवूनी सारी मालमत्ता
आयुष्य झाले हो वाकडे
संपत्तीस लागला बट्टा
कुणी न राही धट्टाकट्टा
एकच गोष्ट झाली अलबत्ता
उदंड झाली हो माकडे || ११ ||