नियती
डिसेंबर 2, 2016पेराल तसे उगवेल
फेब्रुवारी 3, 2017श्रद्धा
एखाद्या गोष्टीचा सतत जप करणं म्हणजे श्रद्धा नव्हे. एखाद्या गोष्टीशी संबंधित कर्मकांड काटेकोरपणे करणं म्हणजे श्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे संपूर्ण विश्वास. आपल्या श्रद्धास्थानांना धक्का लागू नये म्हणून कोणत्याही थराला जाण्याच्या आजच्या काळात श्रद्धेची ही व्याख्या किती जणांना लागू होते?
इंद्रदेवजी बसले होते
नारद म्हणती त्यांना
पॄथ्वीलोकी पर्जन्याचा
यज्ञ होर्इ पाहा ना || १ ||
इंद्रदेव हसले अन् वदले
ठाऊक आहे मजला
यज्ञाचा तो घोष कधीचा
आहे मला समजला || २ ||
कामच आहे माझे देर्इन
तेथ पर्जन्यदान
गर्दीत आहे एक तरी का
बघतो श्रद्धावान || ३ ||
जनसागर हा कसा दिसावा
श्रद्धावान तुम्हा
नारदमुनी पण एक प्रश्न तो
करती पुन: पुन्हा || ४ ||
इंद्रदेव तरी निरखून बघती
शोधत श्रद्धावान
खुलला चेहरा दिसू लागले
नजरेत समाधान || ५ ||
देवराज मग डोळे मिटुनी
वरूणदेवा स्मरती
मेघांची ती फौज पाठवा
त्वरित पॄथ्वीवरती || ६ ||
नारद करती प्रश्न पुन्हा मग
बोलले इंद्रदेव
एका व्यक्तीमध्ये दिसली
श्रद्धेची मज ठेव || ७ ||
पर्जन्याच्या यज्ञाकरता
आले लोक अनेक
छत्री घेऊन आला होता
त्यातील केवळ एक || ८ ||
देव देव बघ सारे करती
श्रद्धेचा तो भास
होता फक्त त्या एकाचा
माझ्यावर विश्वास || ९ ||
समजून गेले नारद लागे
नाही एकही क्षण
गाली हसून म्हणू लागले
नारायण नारायण || १० ||
श्रद्धा असते देवावरती
श्रद्धा धर्मावरती
श्रद्धा असते विज्ञानावर
श्रद्धा कर्मावरती || ११ ||
विश्वासाच्या पायावरती
असते सात्विक श्रद्धा
आस्तिक असते श्रद्धा आणिक
असते नास्तिकसुद्धा || १२ ||
श्रद्धेसाठी विश्वासाची
असते खरी परीक्षा
पार करती जे मन:शांतीची
मिळते त्यांना दीक्षा || १३ ||