आई
फेब्रुवारी 18, 2011अघोरी
जून 3, 2011शिकवण
२१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वर्णभेदविरोधी दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. भारताला वर्णभेदाची लागण जरी झाली नसली तरी जातीयवादाची पाळंमुळं फार खोलवर पसरलेली आहेत. २१ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय कविता दिन’सुद्धा असल्यामुळे ह्या विषयावर आधारित माझी ‘शिकवण’ ही कविता सादर करत आहे.
स्वामीजी म्हणती राजाला एक मागणे आज
सांगीन गोष्टी युक्तीच्या मी दे मजला युवराज
ठेवीन माझ्या संगे त्याला शिक्षण करीन त्याचे
सहाय्य होईल तुजला करण्या तुझेही कामकाज || १ ||
राजा म्हणतो धन्य भाग्य ते धाडी युवराजाला
युवराज गुणी तो स्वामीजींचा पट्ट शिष्य मग झाला
आश्रमात राहुनिया करतो सेवा स्वामीजींची
ज्ञानप्राप्तीही सारी करूनी घरास परतुनी आला || २ ||
स्वामीजींच्या मनात होता विचार काही नेक
युवराजाला ठेऊन घेण्या कारण होते एक
राजाच्या त्या राज्यामध्ये गेले होते स्वामी
जनतेमध्ये दिसे तयांना दुःखाचा अतिरेक ।। ३ ।।
जातीयतेला उधाण जागोजागी अस्पृष्यता
मनामनातील भिंतींना ते राज्य देई मान्यता
भेदभाव तो पाहून झाले स्वामीजी विदीर्ण
शिक्षण दिधले युवराजाला सर्वश्रेष्ठ मानवता ।। ४ ।।
वर्षे सरली स्वामीजींना फिरून एकदा वाटे
जावे त्या राज्याला आहे जुने आपुले नाते
पिढी बदलली झाला होता राजा तो युवराज
पाहून स्वामीजींना हर्षे कंठ तयाचा दाटे ।। ५ ।।
म्हणतो त्यांना विस्मरलो मी नाही तुमची शिकवण
शूद्रांची माझ्या राज्यातील संपविली मी वणवण
चला दावतो तुम्हास माझे राज्य कसे चालते
महालास लागूनच आहे भव्य एक ते उपवन || ६ ||
उपवन होते नयनरम्य ते मुले खेळती तेथे
राजा म्हणतो पूर्वी शूद्र खेळत नव्हते येथे
नियमच होता शूद्रांना उपवनात होती बंदी
राजा होता सर्वप्रथम मी नियम रद्द केले ते ।। ७ ।।
आता येथे येण्याकरता नाही कुणा मज्जाव
मुळावरी मी त्या रूढीच्या केला कुठारघाव
हिरवे कपडे घालून येती उच्चवर्गीय बालक
शूद्र घालती लाल वस्त्र ते संशयास ना वाव ।। ८ ।।
अभिमानाने सांगत होता राजा आपुली कहाणी
रंगीत कपडे पाहून स्वामीजींच्या नयनी पाणी
थांबवले राजाला त्यांनी अचंबीत तो झाला
म्हणती माझ्या शिक्षणावरी फिरविलेस तू पाणी || ९ ||
शूद्र आजही शूद्रच आहे वाटे मजला लाज
होईल शब्दच हद्दपार चुकला माझा अंदाज
चूक सुधारीन भविष्यात तू दे मज गुरूदक्षिणा
सांगीन गोष्टी युक्तीच्या मी दे मजला युवराज ।। १० ||