गुन्हा
जून 21, 2013दुःख
ऑक्टोबर 18, 2013वेल
निसर्गाची हेळसांड केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात ते उत्तराखंडातील घटनांवरून चांगलंच लक्षात आलं आहे. निसर्गावर कुरघोडी करताना आपणही निसर्गाचं एक अविभाज्य अंग आहोत हेच मुळी आपण विसरून बसलो आहोत.
जंगलामध्ये झाड एक ते होते बहारदार
फळे, फुले अन् पानांचा तो भरलेला संसार
लक्ष तयाचे गेले होती मध्यान्हीची वेळ
उगवत होती मुळाशी अशी नाजूक सुंदर वेल || १ ||
प्रथमदर्शनी झाडाला ती वेल भावली फार
करीन रक्षण तुझे म्हणाले मन करूनिया उदार
भार तुझा तो नाजूक मजला नक्की बघ पेलवेल
वाढू लागली झाडाच्या मग आधाराने वेल || २ ||
वाढत गेली वेल परंतु अशी काही वाढली
बुंध्यासंगे फांद्यांवरही दूर पसरू लागली
झाडावरच्या फुलपानांचा आटोपू लागे खेळ
ओक्याबोक्या झाडावर मग उरली केवळ वेल || ३ ||
झाडाच्या आधारी आहे आपुले अस्तित्व
करत राहिली दुर्लक्षित ती ह्याचे महत्त्व
झाडच नसले तरीही माझी वाढ कोण अडवेल
अशाच उन्मादाने फोफावत राहे ती वेल || ४ ||
झाड असे ते पृथ्वी आणि वेल असे तो मानव
आधारभूत सृष्टीसाठी बनला आहे दानव
अती महत्वाकांक्षेपायी पृथ्वीच बळी पडेल
पण झाड उन्मळून पडल्यानंतर जगेल कशी हो वेल || ५ ||