बिस्किटाचा पुडा
फेब्रुवारी 4, 2011वरदान
आयुष्य सुखी करण्याकरता घोर तपस्या करून देवाकडून वरदान मागून घ्यावं अशा आशयाच्या कथा आपण लहानपणापासून वाचत, ऐकत आलो आहोत. पण एखादं वरदानच जर शाप ठरलं तर …
सहा महिने तपश्चर्या
अशी केली घोर
पावला तेव्हा देव मजला
पाहून माझा जोर || १ ||
इन्स्टंट मागता सगळं म्हणून
पावलो मी लवकर
सहाच महिने तपश्चर्या
मिळेल एकच वर || २ ||
शब्द फुटेना आनंदाला
नव्हता पारावार
काय मागू काही सुचेना
सुरू केला विचार || ३ ||
आयुष्य मागू पैसा मागू
मागू आरोग्य
एकच संधी होती ठरेल
काय आता योग्य || ४ ||
तिष्ठत ठेवणं योग्य नव्हतं
परमेश्वराला
एवढ्यात एक साॅलिड विचार
मनामध्ये आला || ५ ||
एकच वरदान मजला प्रभो
द्यावे तुम्ही असे
स्वच्छ कळू दे मला समोरच्या
मनात काय वसे || ६ ||
तथास्तू मग प्रभू म्हणाले
घडला चमत्कार
कळला मजला देवाजीच्या
मनातला विचार || ७ ||
ठाऊक नाही पामरास ह्मा
हे कसले वरदान
पुढचं कळण्याआधी प्रभू
पावले अंतर्धान || ८ ||
शंका साऱ्या दूर सारल्या
विसरून गेलो भया
ओरडून सांगीन जगास आता
लो मै आ गया || ९ ||
प्रात:काळी उठलो
ऐकला बायकोचा विचार
स्वयंपाकाचा कंटाळा
आलाय आज फार || १० ||
तिला म्हणालो संध्याकाळी
बाहेर घेऊ जेवण
ऐकून चेहरा झाला तिचा
हसरा एकदम ए वन || ११ ||
साहेबाला खूश केलं
गोष्टं नव्हती साधी
प्रत्येक फार्इल नेऊन दिली
त्याने मागण्याआधी || १२ ||
म्हंटलं मनात काय फक्कड
वरदान मागून घेतलं
आयुष्यात सुरळीत होर्इल
आता पुढचं सगळं || १३ ||
एवढ्यात ऐकू आलं
साहेब मनात होता म्हणत
ह्माच्याकडनंच करून घेतो
आता ढोर मेहनत || १४ ||
उदास होऊन परत आलो
माझ्या जागेवर
साहेबाने पाठवून दिला
कामाचा डोंगर || १५ ||
दमून परतताना ट्रेनला
होती भारी गर्दी
प्रत्येकाचे विचार ऐकून
शुद्ध हरपली अर्धी || १६ ||
चेहरे वरून शांत परंतु
मनात कोलाहल
प्रत्येक जण पचवत होता
आपले हलाहल || १७ ||
इमारतीचा वाॅचमन करतो
सलाम हसून गाली
विचार त्याचे ऐकून माझी
शक्ती क्षीण झाली || १८ ||
मर मर काम करतो
मारतो मोठी स्टार्इल
रोज वेगळया मित्राबरोबर
असते ह्माची बार्इल || १९ ||
एका दिवसात समजून चुकलो
गोष्ट कामाची
झाकली मुठ बरी असते
सव्वा लाखाची || २० ||
विश्वासाची माणसं पाठीत
खुपसतात खंजीर
समजलं हे जेव्हा झाला
होता फार उशीर || २१ ||
जिथे जार्इन तिथे ऐकतो
जगाचे मी व्याप
ऐकून ऐकून दमून गेलो
भरला मजला ताप || २२ ||
डाॅक्टर इस्पितळात म्हणती
लगेच भरती व्हा
मनात म्हणती उरले ह्माचे
महिने फक्त सहा || २३ ||
कालपर्यंत सुखात होतो
झालो आता कष्टी
वर मिळवण्यापूर्वी होती
दॄष्टीआड सॄष्टी || २४ ||
इस्पितळातली कंटाळवाणी
असते ती दिनचर्या
सहा महीने आहेत पुन्हा
करतोय तपश्चर्या || २५ ||