माकड आणि माणूस
डिसेंबर 18, 2015नरक
फेब्रुवारी 5, 2016वरचढ
खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला . . .
प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी || १ ||
शनीच्या वाटेमध्ये जेव्हा आला ऐरावत
खोडी काढली मुद्दामच ती होर्इ शनीचे मत || २ ||
इंद्रही चिडला वाढत गेला शब्दामागून शब्द
पाहून दोघांचा आवेश देवही झाले स्तब्ध || ३ ||
चूक कोणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद || ४ ||
इंद्राने जरी शूरपणाचा आव आणला होता
जाणून होता ताकद शनीची मनी वरमला होता || ५ ||
अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
शूर स्वत:ला समजतोस तर हे माझे आव्हान || ६ ||
नाश करीन मी तीन दिसांतच तुला सांगतो आज
असेल ताकद तुझ्यामध्ये तर राख स्वत:ची लाज || ७ ||
ऐसे बोलून शनी जातसे आपटत आपुले पाय
इंद्राच्या मग ध्यानी आले करून बसलो काय || ८ ||
देवगणांना त्वरित बोलवून विचारतो तो सल्ला
रक्षण कसे करावे शनीने केला जर का हल्ला || ९ ||
चिंता होती जाळत भीतीच्या पेटत होत्या ज्वाळा
शनीपासूनी रक्षण होण्या गेला तो पाताळा || १० ||
कडेकोट रक्षण सामग्री रचली त्याने तरी
काळीज लपलप करी तयाचे पानही हलले जरी || ११ ||
अतीव चिंतेमुळे समयही सरता नव्हता सरत
उरला वेळ किती ते पुसतो इंद्रही परत परत || १२ ||
तीन दिवस बसला तो धरूनी तॄण आपुल्या दातात
नंतर इंद्र येर्इ सामोरा जेत्याच्या थाटात || १३ ||
पाताळाच्या द्वारापुढती शनी तयाला दिसला
त्याला पाहून कंठच क्षणभर इंद्राचा मग बसला || १४ ||
सावरल्यावर इंद्र वदे का करशी अशा वल्गना
तुला बळाची माझ्या आली असेल बघ कल्पना || १५ ||
इंद्राचा तो आव पाहुनी हसत आपुल्या गाली
शनी म्हणाला अरे तुझ्यावर कशी वेळ ही आली || १६ ||
मुद्दा आपूल्या वादाचा तो श्रेष्ठ तू का मी
सामर्थ्याहून युक्तीच माझ्या आली बघ ती कामी || १७ ||
मला घाबरून तीन दिवस तू पाताळी बसतोस
आणि आपुल्या सामर्थ्याच्या गप्पाही करतोस || १८ ||
ऐके जेव्हा इंद्र त्या झणी खरे शनीचे बोल
समजे अन् अवसान आपुले होते किती ते फोल || १९ ||
सामर्थ्याची जाणीव असणे हाच खरा तो खेळ
वापरण्याची बळ तुमचे मग येतच नाही वेळ || २० ||