logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
पोटचा गोळा
डिसेंबर 4, 2015
वरचढ
जानेवारी 1, 2016
माकड आणि माणूस
डिसेंबर 18, 2015
माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा . . .

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || धृ ||

खोलीमध्ये शिडी एक
उभी होती केली
हुशार एका माकडाची
नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
शिडीवर तू चढ
माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || १ ||

खायला केळी माकड जेव्हा
वर चढलं झणी
शास्त्रज्ञांनी बाकीच्यांवर
फवारलं मग पाणी
वारंवार जेव्हा एक
माकड शिडी चढलं
बाकीच्यांवर लगोलग
थंड पाणी पडलं
काय चाललंय नव्हतं शिरत त्यांच्या डोक्यात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || २ ||

चाणाक्ष ती होती थोड्या
दिवसांत समजून चुकली
शिडी कोणी चढलं जर तर
चंपी होते आपली
तेव्हापासून कोणतं माकड
शिडी लागलं चढू
तर बाकीची माकडं त्याला
यथेच्छ लागली बदडू
पाणी थांबलं तरीही कोणी केळी नव्हतं खात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || ३ ||

शास्त्रज्ञांनी मग एक
माकड बाहेर काढलं
त्याच्याजागी दुसरंच एक
माकड आत सोडलं
शिडीवर ते माकड चढताच
झाला की प्रकोप
बाकीच्या माकडांनी त्यालाही
मग दिला चोप
नवीन माकड केळी खाण्याची करेना बात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || ४ ||

शास्त्रज्ञांनी जुन्यापैकी
आणखीन एक माकड
काढून त्याच्या जागी आणलं
नवीन एक माकड
जेव्हा होतं केळी खायला
शिडी ते चढत
नवीन माकडाचीही झाली
व्हायची तीच गत
समजत नव्हतं तरी निमूट बसलं मार खात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || ५ ||

नवल म्हणजे त्याआधी जे
माकड आलं होतं
तेही त्याला ठोक देण्यात
सामील झालं होतं
त्याच्यावर तर कधीच पाणी
फवारलेलं नव्हतं
पण बाकीच्यांचं वागणं हेच
कारण पुरत होतं
थोड्याच दिवसांत खोलीमध्ये नवी माकडं सात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || ६ ||

का मारतोय कोणालाच ना
विचार करणं सुचलं
गार जळाने त्यांच्यापैकी
कोणीच नव्हतं भिजलं
काय नक्की चाललंय हे तर
कोणाला ना ठाऊक
पण शिडीजवळ गेलं कोणी
मार मिळायचा घाऊक
सातापैकी कुणीच लावेना केळ्यांना त्या हात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || ७ ||

आपणही धरून बसतो
रूढी आणि प्रथा
काळाच्या ओघात ज्यांचा
चावून झालाय चोथा
प्रगतीच्या वाटेवर करूया
एकमेका सहाय्य
बदलून टाकू चालीरिती ज्या
आहेत कालबाह्म
माकडांपेक्षा आहे ना हो आपली प्रगत जमात
नाहीतर खोलीत माकडांपेक्षा माणसंच सोडा सात || ८ ||

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात || धृ ||

शेअर करा
66

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो