वरदान
फेब्रुवारी 4, 2011आई
फेब्रुवारी 18, 2011बिस्किटाचा पुडा
तिऱ्हाईतांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा आपला दृष्टीकोन असतो. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की अनोळखी व्यक्तींवर भरवसा ठेवू नये. पण कधी कधी काही अनोळखी व्यक्तीच आपल्याला आयुष्यातील काही मौलिक धडे शिकवून जातात.
पहिली मीटिंग आटोपल्यावर
एअरपोर्ट गाठलं थेट
गेल्यानंतर कळलं तिथे
फ्लार्इट होतं लेट || १ ||
भूक लागली होती म्हटलं
नाश्ता करीन थोडा
एअरपोर्टवरच घेतला एक
बिस्कीटांचा पुडा || २ ||
तळकट नसतात आणि
असते कमी त्यात शुगर
चाळीशीला आले माझी
मेंटेण्ड होती फिगर || ३ ||
वी आय पी लाउंजमध्ये
थंडगार ती बैठक
वाचत बसले अर्धवट
सोडलेलं मी पुस्तक || ४ ||
बिस्कीटं अन् पर्स होती
शेजारच्या खुर्चीवर
एक बिस्कीट खाऊ लागले
काही वेळानंतर || ५ ||
एक मनुष्य बसला होता
पलीकडच्या खुर्चीवर
एक बिस्कीट त्यानेसुद्धा
घेतलं माझ्यानंतर || ६ ||
आश्चर्याने त्याच्याकडे
वळून मी पाहिलं
मान झुकवून त्याने मला
स्माइल एक दिलं || ७ ||
अशा अनाहूत सलगीला पण
ओळखून होते नीट
दुर्लक्षून आणखीन एक
घेतलं मी बिस्कीट || ८ ||
माझ्या कोरड्या प्रतिसादाला
न घालता भीक
पुन्हा त्याने बिस्कीट घेतलं
माझं एक अधिक || ९ ||
वागण्याकडे त्याच्या लक्षच नाही
होते दाखवत
पण आत मात्र संतापाने
होते मी खदखदत || १० ||
असं करत शेवटचं एक
बिस्कीट राहिल्यावर
अर्धं बिस्कीट तोडून त्याने
केला पाहा कहर || ११ ||
तेवढ्यात माझ्या फ्लाइटबद्दल
शब्द कानी आले
अर्धं बिस्कीट तसंच सोडून
तेथून मी निघाले || १२ ||
बोर्डिंग सुरू झालं होतं
गेले मग मी आत
आगाऊ ते वागणं नव्हतं
मनामधून जात || १३ ||
करून उथळ खोट्यानाट्या
सलगीचा बहाणा
निम्मी बिस्कीटं खाऊन गेला
कसा तो शहाणा || १४ ||
मोबाइल शोधण्याकरता
हात आत घातला
तर पर्समध्ये बिस्कीटाचा
पुडा हाती लागला || १५ ||
गोंधळ सरला डोक्यात माझ्या
प्रकाश पडला लख्ख
बिस्कीटं त्याच्या पुड्यातली
मी खाल्ली होती चक्क || १६ ||
पुडा विकत घेऊन माझ्या
पर्समध्ये मी ठेवला
त्याचा पुडा माझा म्हणून
निम्म्यावर मी खाल्ला || १७ ||
मघाचचे ते चित्र माझ्या
डोळ्यासमोर आले
आपले वागणे आठवून मग मी
मेल्याहूनही मेले || १८ ||
त्याच्या जशा वागण्यावर मी
चिडले होते अशी
खरं तर मीच त्याच्याबरोबर
वागले होते तशी || १९ ||
सारखाच प्रसंग मी तर संतापाने
बसले कुढत
त्याने मात्र अर्धा हिस्सा
दिला तोही हसत || २० ||
आयुष्यात बऱ्याच ठिकाणी
व्यक्ती अशा भेटतात
नकळत आपणा बरंच काही
शिकवून त्या जातात || २१ ||
धन्यवादही घेतला नाही
शिकवून गेला धडा
कारण होतं साधा एक
बिस्कीटांचा पुडा || २२ ||