दरवडेखोर
जुलै 3, 2015पोटचा गोळा
डिसेंबर 4, 2015बायकोचा मित्र
‘घर की मुर्गी दाल बराबर’ ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या ‘बायको’ ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे ‘बाहर की दाल मुर्गी बराबर’ वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.
दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा
आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा
थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू
मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर ‘हॅलो, हाऊ आर यू’
‘गिव मी टू मिनिट्स’ असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला
वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला
रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा
आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा
नवर्याचं घरात लक्ष नाही हे होतं तिच्याकडचं चित्र
आणि मला खटकत होता माझ्या बायकोचा एक संशयित मित्र || १ ||
अशीच एक दिवस ती अचानक एका चॅटवर आली
सॉरी, इट्स ओके म्हणता म्हणता थोडी ओळख झाली
अनियमितपणे चॅट करताना बदलत गेला नूर
नियमित झालं चॅट जेव्हा जुळत गेले आमचे सूर
तिला निकड होती बोलायची कुठेतरी करून मोकळं मन
माझ्यापुढे मोकळी झाली ती तोडून मनाचं बंधन
सुशिक्षित ती होती चांगली मोठा होता हुद्दा
खोर्याने पैसा कमवत होता तिचा नवरा सुद्धा
स्वत: सोडून तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीत नव्हतं कुणी अन्यत्र
बघता बघता मी झालो त्याच्या बायकोचा जिवलग मित्र || २ ||
माझीही बिकट झाली होती कौटुंबिक परिस्थिती
घरी कितीही सुख ओतलं तरी माझी ओंजळ राहत होती रिती
घर होतं मुलं होती दाराशी होती गाडी
बायकोला करावी लागत नव्हती इकडची तिकडे काडी
तिचा दुर्मुखलेला चेहरा पाहून येत असे मला काव
कधीच जाणून घेतले नाहीत तिने माझ्या ऑफिसमधील ताणतणाव
आधी आधी ती माझा शब्द खाली नव्हती पडू देत
आता मात्र मला सतत मिळत होती उलट उत्तरांची भेट
मिळणार्या प्रगल्भ उत्तरांनी वाढत गेली आमची चॅटची सत्रं
तरी डोक्यात सतत पिंगा घालायचा माझ्या बायकोचा तो संशयित मित्र || ३ ||
चॅटवर आम्ही कालच एकमेकांशी कबूल केलं होतं
चॅटवरचं तिचं नाव आणि माझंही नाव होतं खोटं
आज घेणार होतो आम्ही एकमेकांना विश्वासात
आणि म्हणूनच मी पाहत होतो सहा वाजण्याची एवढी वाट
थोडेसे आढेवेढे घेऊन तिने परिचय दिला स्वत:चा
नाव तिचं वाचलं आणि गेली माझी वाचा
मला एका मैत्रीणीची गरज आहे हे गॄहित होतो धरून
पण तीच गरज माझ्या बायकोला आहे हे वाचून पार गेलो हादरून
परूषी अहंकार ठेचला गेला आली डोळ्यांसमोर काळरात्र
माझा संशय खरा होता… माझ्या बायकोचा मीच होतो तो संशयित मित्र || ४ ||