वीज
नोव्हेंबर 7, 2014एक तास
मे 6, 2015बहिरा
दुसऱ्याकडे बोट दाखवताना (निदान) तीन बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे कधी कधी आपलेच शब्द आपल्याच घशात जायची वेळ येते. अशाच कुठेतरी वाचलेल्या एका विनोदावर आधारित ही कविता . . .
बरेच दिवस घोळत होता संशय माझ्या मनात
गडबड आहे नक्की माझ्या बायकोच्या कानात
ह्मा बाबतीत समजत नव्हतं करू तरी काय मी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || १ ||
कान नाक घसा तज्ज्ञ होता माझा मित्र
भेटून त्याला मनचं माझ्या स्पष्ट केलं चित्र
मित्राने सांगितली मला शक्कल एक नामी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || २ ||
बेडरूममधला टीवी तिने बंद केला जसा
घराबाहेर जाऊन माझा खाकरला मी घसा
शक्कल कामास येर्इल त्याने घेतली होती हमी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || ३ ||
दारातून ओरडलो आज काय आहे जेवण
उत्तर नाही बाहेर आले शेजारचे चौघेजण
पहिलीच पायरी होती तसा होतो मी संयमी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || ४ ||
बेडरूमच्या दारात जाऊन पुन्हा विचारलं पण
तरीही उत्तर आलं नाही होतं काय जेवण
तिच्यापर्यंत पोहोचत नव्हती माझी वित्तंबातमी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || ५ ||
अगदी जवळ जाऊन पुन्हा प्रश्न विचारला तर
लिहीत होती पाहिलं नाही मानही करून वर
संशय पक्का झाला हृदय झालं माझं जखमी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || ६ ||
वार्इट वाटलं मन माझं भरून आलं आत
जवळ बसलो तिनेच माझा हातात घेतला हात
चेहर्यावरती तिच्या भरले होते भाव छद्मी
माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी || ७ ||
किती वेळा सांगू आहे भाकरी आणि कालवण
तरीही परत परत विचारतोस काय आहे जेवण
मित्राला दाखवून ये तुला ऐकू येतय कमी
माझ्या बायकोच्या कानात काहीच नव्हतं कमी || ६ ||
आपल्यामध्ये उणीव विश्वास नसतो कोणाला
हसतो लोकाला अन् शेंबूड आपल्या नाकाला
कानाचं हे यंत्र लावणं आहे माझ्याच जन्मी
माझ्या बायकोच्या कानात काहीच नव्हतं कमी || ९ ||