दृष्टी
सप्टेंबर 16, 2016नियती
डिसेंबर 2, 2016नशीबवान
प्रेमात पडताना ‘पडणं’ हे क्रियापद तोंडघशी पडणं ह्या अर्थाचंही ठरू शकतं ह्याचं भान ठेवावं लागतं. पण अनुभवावरून शिकता आलं तर ते प्रेम कसलं. तिथे ‘पुढच्यास ठेच मागचा पडला’ असं होण्याची शक्यता जास्त असते . . .
नोकरीत दिवस पहिला
उशीर नको सहीला
वेळ पाळणं जमलं
स्वतंत्र माझी जागा
घोड्याची जणू पागा
कामही सुरु झालं || १ ||
आजूबाजूस बघता
वेळ कुणाला नव्हता
सर्वच ते सिनिअर
मग्न आपल्या विचारी
सुखी आणि संसारी
मीच एक बॅचलर || २ ||
दिसली कोपऱ्यात दूर
आपल्याच कामात चूर
पहिल्यांदा ती मला
कोणाच्या ना अध्यात
आणि नाही मध्यात
म्हटलं बोलू चला || ३ ||
वाजला होतं दीड
चेपल्यावरती भीड
काढला माझा डबा
तिला विचारल्यावरती
मला म्हणाली ती
बस की रे बाबा || ४ ||
चेहेरा होतं साधा
परंतु सुडौल बांधा
चष्मा लावे मोठा
लावे ना पावडर
गोऱ्या चेहेऱ्यावर
लाली नव्हती ओठा || ५ ||
काही मग दिवसांत
मैत्री होई आमच्यांत
एक वाटे नवल
राखुनिया अंतर
तिच्याहून इतर
टाळत तिला सरळ || ६ ||
अखेर न राहवून
टाकलं मी विचारून
सोडे ती सुस्कारा
मोठी ती गोष्ट
सांगणे तुज इष्ट
प्रकार काय तो सारा || ७ ||
पुढल्या रविवारी
गेलो तिच्या घरी
गोष्ट तिची ऐकायला
सांगते तुजला ऐक
ऑफिसमध्येच कैक
प्रियकर होते मजला || ८ ||
पहिला तो प्रियकर
बॉस माझ्यावर
वरलं होतं त्याला
केली खूपच मौज
फिरायची मज हौस
कळलं होतं त्याला || ९ ||
एकदा फिरण्यासाठी
गाठली अन् चौपाटी
भेळ होतो चरत
आली मोठी लाट
घेऊन गेली आत
दिसलाच नाही परत || १० ||
दुसरा होतं क्लार्क
दिसला माझ्यात स्पार्क
माझेही मन बसे
शरीरयष्टी जाड
होता तो खादाड
आवडत त्याला मासे || ११ ||
जेवायचं आमंत्रण
भाकरी अन् कालवण
बेत होतं खास
घशात अडके काटा
मिटल्या श्वसनवाटा
तिथेच खेळ खलास || १२ ||
तिसरा कॉन्ट्रॅक्टर
होतं जो चॅप्टर
भेटायचा गुपचूप
कथा अशी प्रेमाची
आवड सिनेमाची
दोघांनाही खूप || १३ ||
गेलो फिल्म पाहाया
अमिताभ आणि जया
थेटरात लागली आग
गर्दीत इकडे तिकडे
शोधलं सगळीकडे
पण लागला नाही माग || १४ ||
माझा काय गुन्हा
घडती पुनःपुन्हा
प्रसंग माझ्या बाबतीत
चेहेरा तिचा भकास
मीही होई उदास
बसून तिच्या संगतीत || १५ ||
ऑफिसमधले सारे
राहती दूर बिचारे
तिची वाटते भीती
मोठी वयाने जरी
मनोमनी तिजवरी
जडली माझी प्रीती || १६ ||
म्हटलं घाबरू नकोस
दुःखाचे हे डोस
बसू नको तू पीत
आज उशीर जाहला
पुन्हा भेटीन तुला
मनीचे वदिन गुपित || १७ ||
वदून असे मी उठलो
घरून बाहेर पडलो
होतो तरंगत
पायरी तुटली होती
पद ठेवायची खोटी
पुढचे विसंगत || १८ ||
मोडली माझी मान
तरीही नशीबवान
वाचलो जीवानिशी
आता दूरच बसतो
लांबूनच मी हसतो
खोड जिरली अशी || १९ ||