प्रतिशोध
जानेवारी 3, 2014पाप
जुलै 4, 2014दीर्घायुषी राजा
लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांतच पार पडतील. आता बहुतेक नवा भिडू, नवे राज्य आणि नवीन राजा. हा नवीन किंवा नव्याने येणारा जुना राजा ह्या गोष्टीतून काही बोध घेईल का?
वर्षं झाली दोन महिने उलटून गेले चार
पाहूणचारही किती घ्यावा वाटत होती लाज
विचार करून थकले होते पाचही मंत्री पार
तरीही पुन्हा तोच प्रश्न करणार होते आज
तोच प्रश्न तेच उत्तर तिथेच सारं अडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || १ ||
दूरदेशीहून आले होता मोठा त्यांचा देश
पण अल्पवयातच मरतो राजा होत नव्हता बोध
राजाने त्या मंत्य्रांना मग दिला असा आदेश
येथील राजा दीर्घायुष का घ्यावा ह्माचा शोध
आले होते घेऊन अंगावर जे काम पडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || २ ||
येथील राजा म्हणतो स्वामी देतील तोड तुम्हांस
थांबा येथे गेले आहेत यात्रेला ते दूर
परत येता स्वामी मंत्री गेले विचारण्यास
स्वामीजींनी दिला नाही लागून ताकास तूर
कधी काही कारण तर कधी काही बिघडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || १ ||
दोन वर्षांपूर्वी शेवटी वदले त्यांना स्वामी
तुमच्या प्रश्नाकडे माझं खचितच आहे लक्ष
माझे विचार काही काळात येतील तुमच्या कामी
वठून जावा लागेल उद्यानातील तो वटवृक्ष
शब्द ऐकुनी त्या मंत्य्रांचं डोकंच होतं फिरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ४ ||
रोज रोज एकच प्रश्न वठला का तो वड
रोज रोज नकाराची झाली मग सवय
परत जाणं अशक्य जोवर लागत नव्हती तड
राजा करील शिक्षा ह्माचं वाटत होतं भय
आला दिवस ढकलत जाणं एवढंच काम उरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ५ ||
आजही आले उठून त्यांचे चेहरे पाच भकास
बातमी आणली कोणी त्यांनी विचारण्याच्या आधी
कानांवरती त्यांचा आपल्या बसेचना विश्वास
नाचू लागले सारे कारण बातमी नव्हती साधी
उद्यानातील झाड वठून रात्रीच होतं पडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ६ ||
धावत जाऊन स्वामीजींचे धरले त्यांनी पाय
ह्माच दिवसासाठी आलो दूरवरी मुद्दाम
राजाच्या दीर्घायुष्याला सांगा काय उपाय
जाऊन सांगू राजाला मग होईल आमुचे काम
चेहर्यावरचं ढळलं नाही स्मितहास्य जे जडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ७ ||
स्वामी म्हणाले परतुनी जावे पाहा वृक्षही वठला
कबूल केला तसा तुम्हाला उपाय सांगून झाला
कधी कुणी अन् कसा कुठे सांगितला उपाय कुठला
चक्रावून गेले मंत्री तरी फिरले माघाराला
काय कथावे राजाला ते जाण्याआधी ठरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ८ ||
परतून आपुल्या राजासमक्ष वदले सारी कथा
अडीच वर्षं परदेशी त्यांचा तो उपक्रम
सांगत होते राजाला जी मनात होती व्यथा
राज्यातील त्या राजा स्वामी सारे जण चक्रम
कुणी भाकली करूणा कुणी घाबरून आणि रडलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं || ९ ||
राजा विचार करू लागला कथेवरी मंत्य्रांच्या
वटवॄक्षाला वठण्यासाठी हवी दोनशे वर्षं
पाच मंत्री पण उठले होते जीवावरी झाडाच्या
म्हणून पुरली वठण्याकरता केवळ दोनच वर्षं
फक्त पाच जणांच्या दुस्वासाने झाड किडलं
समजू लागलं स्वामीजींच्या मनात काय दडलं || १० ||
राज्यकारणासाठी त्याने दिले प्रजेला दु:ख
तळतळाट राजास प्रजेचा करता अत्याचार
कसे चालते राज्य आपुले झाला अंतर्मुख
असंतुष्ट जनतेने दिधले मनस्तापही हजार
दीर्घायुषी राजाचं गुपितच त्याला मग सापडलं
अन् समजून चुकला स्वामीजींच्या मनात काय दडलं || ११ ||