एक तास
मे 6, 2015बायकोचा मित्र
ऑगस्ट 21, 2015दरवडेखोर
खरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला . . .
ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || धृ ||
ऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर
आश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर
बंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा
कुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर
स्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || १ ||
सोडूनी मांड गाठी तो भरभर स्वामींचे दालन
बोले दरडावून करा जे सांगीन ते पालन
मोठा स्वामी आश्रमात ह्मा वसतो मज सांगितले
आणा त्यास इथे करण्याला पापाचे क्षालन
घाबरूनिया गेला असता असता कोणी दुसरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || २ ||
स्वामीजींनी दिधले त्याला बसावया आसन
वदले त्याला दमला असशील कर तू जल प्राशन
बंदूक आणि सुरा हाताशी ठेवूनिया तो बसला
त्याच्याशी मग करू लागले स्वामी संभाषण
बोल रांगडे ऐकुनी खिळल्या त्याच्यावरती नजरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ३ ||
म्हणतो तो चोरांच्यामध्ये माझे मोठे नाम
धाक दावूनी जनास लुटणे एकच माझे काम
खेळण्यास ही ठेवत नाही शस्त्रे माझ्यापाशी
आड कुणीही येता त्याचे करतो काम तमाम
ह्मा हातांनी केल्या असतील हत्या किमान सतरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ४ ||
स्वामी म्हणती माझेसुद्धा कामच आहे चोरी
पापांच्या बाबतीत माझी पाटी नाही कोरी
हत्या माझ्या हातीसुद्धा झाल्या असतील अठरा
मीही करतो आल्या गेल्या लोकांवर शिरजोरी
निरखून पाही दरवडेखोर स्वामीजींचा नखरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ५ ||
बसून राहिला दरवडेखोर तिथेच अवघडलेला
स्वामीजींच्या बोलांवरती विचार त्याने केला
उभा राहिला बंदूक आणि सुरा घेऊनी हाती
लगबग करूनी मूकपणे तो तेथून निघून गेला
शिष्य पाहती स्वामीजींना भाव डोळ्यांत दुखरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ६ ||
एक विचारी स्वामी तुमचे बोल चुकीचे काही
स्वामी म्हणती जगाकडे माझ्या नजरेने पाही
त्याने मजला मान दिला हा त्याचा मोठेपणा
पापक्षालनाची पण क्षमता माझ्या अंगी नाही
भार उतरला त्याच्या मनीचा हाच आनंद खरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ७ ||
पाहत बसती एकमेकांस गोंधळल्या मनाने
शिष्यांना उमगला अर्थ त्या बोलांचा उशिराने
रागीट चेहरा घेऊनी आला होता जो आश्रमी
गात जातसे दरवडेखोर आनंदाने गाणे
ऐकून हसले मनाशीच ते शंकांचा हो निचरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || ८ ||
ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा || धृ ||