स्वप्नं
मार्च 15, 2013गुन्हा
जून 21, 2013टेलीविजन
तुम्हाला एखादं व्यसन आहे का हो? माझी खात्री आहे की तुमच्यासारखी मंडळी बहुतेक व्यसनांना ताब्यात ठेवत असतील. मीही ठेवतो. अपवाद आहे एका व्यसनाचा … टेलीविजनच्या व्यसनाचा! काही वेळा व्यसनमुक्त होण्याकरता काहीतरी धक्कादायक घडावं लागतं. कसं ते वाचा …
सायंकाळी घरात पत्नी कामात गुंग होती
पेपर तपासण्याची जबाबदारी असते मोठी
आजकालचे ज्ञान परीक्षेतील मार्कांचा खेळ
म्हटले पाहू पास किती अन् किती जाहले फेल
मान वळवूनी पाहिले तिने डोळ्यात तिच्या पाणी
बोलायाला गेली ती पण कातर होती वाणी
पेपर केला पुढे तिने डोळ्याला लावीत पदर
पेपरमधल्या निबंधावरी गेली माझी नजर
निबंध होता काय मागाल देव तुम्हा पावला
सुंदर होता लिहिला पहिल्या नजरेतच भावला
मागत होते कधीपासूनी एक गोष्ट जी हवी
देवा पुढल्या जन्मी मजला बनवशील का टीवी || १ ||
रोज सांगीन बातम्या नाही घेणार कधी सुट्टी
कोणाशी मी भांडले आणि केली कुणाशी गट्टी
खेळ दाखवीन दिवसभराचे बांधून गच्च केस
पकडा पकडी लगोरी तशी सायकलची ती रेस
सिनेमातील गाणी गार्इन मोकळा करून गळा
डोलू लागतील सगळे थकवा पळेल जेव्हा सगळा
दाखवीन सार्यांना मी स्वयंपाकही माझा पाहा
मॅगी करते छानच मी आणि करते फक्कड चहा
अभिनय जेव्हा दाखवीन मी विसरून जार्इन भान
प्रीती झिंटा बनेन कधी मी अन् कधी शाहरूख खान
हसतील रडतील सारे रोजच गोष्ट सांगेन नवी
देवा पुढल्या जन्मी मजला बनवशील का टीवी || २ ||
माझ्या मनात स्वार्थच आहे गोष्ट सांगते खरी
टीवी बनूनी जायचे मला असे माझ्याच घरी
बोलत असताना मी घरचे सगळे असतील दक्ष
दुसरे कुणी बोलले देणार नाहीत तरीही लक्ष
सगळे माझ्या भवती जमतील दिवस असो वा रात्र
वाट पाहतील सारे माझी सुरू व्हायची मात्र
आजारी जर पडले मी तर घरात गोंधळ उडे
सगळे घरकुल माझ्याकरता काळजी करत रडे
एकटी कधीच झोपणार नाही घरात मी माझ्या
ओरडणारही नाही मजला कुणी भरात रागाच्या
घरात प्रत्येकाला मी मग वाटेन हवी हवी
देवा पुढल्या जन्मी मजला बनवशील का टीवी || ३ ||
वाचुनी वाटे वार्इट मजला काय वेळ ही आली
टीवीसाठी काहीजणांना अपत्यं परकी झाली
उदास होती पत्नी तिजला रडू नाही आवरे
मनात आपुल्या हळव्या असती स्त्रीया हे तर खरे
पाल्य कुणाची असेल मुलगी विचार करतो याचा
नाव वाचले पानावरचे गेली माझी वाचा
लिहिला होता कन्येने माझ्याच सगळा निबंध
मनी छोटीच्या काय साचले नव्हता मजला गंध
मोठा झालो म्हणून वाटे सगळे मजला कळते
चटका बसला पायाखाली काय समजले जळते
निबंध नव्हता ती तर थप्पड जशी कोणी चमकवी
डोळे सताड उघडे झाले बंद जाहला टीवी || ४ ||