बहिरा
नोव्हेंबर 21, 2014दरवडेखोर
जुलै 3, 2015एक तास
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका बावीस वर्षीय भारतीय तरुणाला कामाच्या अतिरेकी ताणामुळे आपले प्राण गमवावे लागले. भविष्यात सुखाचा उपभोग घेता यावा म्हणून दिवसरात्र एक करून काम करायचं आणि ते करताना आसपासच्या लहान लहान आनंददायी सुखांकडे दुर्लक्ष करायचं ही पद्धत आपल्याकडेही सर्वमान्य झाली आहे. पण एखाद दिवशी अशी घटना घडते की कामाच्या धुंदीत असलेल्या आपले डोळे खाडकन उघडतात . . .
रातीचे वाजले दहा होते जेव्हा आली ती
दिवसभराच्या कामाने अन् शिणली होती ती ||
बसून पलंगावरती आपुल्या चिंटू वाचत होता
झाला होता उशीर एवढा तरीही झोपला नव्हता ||
झोप रे चिंटूबाळा आता उशीर आहे झाला
पटकन बोले चिंटू तिला गं एक विचारू तुला? ||
चिंटू विचारी तिजला म्हणता चल लवकरी विचार
एका तासाचा तुजला गं मिळतो किती पगार? ||
दिवसभराचा ताण तिचा मग मनातूनी उन्मळला
मिळती दोनशे रूपये असला प्रश्नच सांग कशाला? ||
गप्पच झाला चिंटू पाहूनी तिचा तो रागरंग
ओढून घेर्इ झणी आपुले पांघरूणातच अंग ||
दिवा मालवून घुश्श्यातच ती तेथून बाहेर पडली
खाण्याचीही तिला परंतु इच्छा नव्हती उरली ||
घडवायाचे होते तिजला कंपनीमध्ये करियर
त्याचसाठी ती राबत होती दिवसा रात्री मर मर ||
नवरा तिचा महत्वाकांक्षी तिच्याच इतका भारी
एका म्यानामध्ये कशा मग राहतील दो तलवारी ||
प्रेमविवाहच असे परंतु नावापुरता फक्त
तीन वर्षं झाली असतील अन् झाले ते विभक्त ||
तेव्हापासून चिंटूला मग फक्त तिचा आधार
चिंटूही पण फारच होता मुलगा समजुतदार ||
उगीच चिडले तिला अंतरी वाटू लागे अपराधी
विचारली होती त्याने तर गोष्ट किती ती साधी ||
राहवले नाही उठली ती त्यास यावे पाहून
खोलीत गेल्या गेल्या बघते चिंटू बसे उठून ||
उगा तुझ्यावर मघाशी मला आला होता राग
काय हवे आहे तुजला ते बाळा लवकर माग ||
नसशील जर चिडणार आर्इ तू एक असे मागणे
मला देऊ कर तुझ्यापासचे शंभर रूपये उसने ||
ऐकून परत तिच्या रागाचा चढू लागला पारा
शंभर रूपये दिले तरीही संयम जमवून सारा ||
उशी उचलतो चिंटू आपुली नोट लागता हाता
उशीखालती होत्या कितीतरी चुरगळलेल्या नोटा ||
पाहून नोटा तिच्या संयमी लागे तेथ सुरूंग
चिंटू मात्र होता त्या नोटा मोजण्यामध्ये गुंग ||
चिडून काही ती बोलणार इतक्यातच चिंटू वळला
करूनी पुढे त्या नोटा तिजला निरागसपणे वदला ||
पुरे दोनशे रूपये हे बघ माझ्याकडुनी घेशील?
माझ्याकरता उद्या तुझा पण एक तास का देशील? ||
फुटे हुंदका कंठातूनी तो जीव असा गलबलला
क्षणात सारा राग तिचा अन् अश्रूंतच विरघळला ||
सुख मिळविण्यासाठी पैसा प्रत्येकाला खूळ
काय करावे पैसा जर का हो दु:खाचे मूळ ||