
पेराल तसे उगवेल
फेब्रुवारी 3, 2017
निरुपयोगी
मे 13, 2018उपदेश

आंतरराष्ट्रीय आरोग्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य हा शब्द बोलून पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला सतराशे साठ सल्ले मिळतात… विशेषतः dietingच्या बाबतीत. एखादा सल्ला आचरणात आणणं किती कठीण आहे हे प्रत्येक सल्ला देणारा विचारात घेतोच असं नाही ….
स्वामीजींच्या भेटीकरता शेटजी आला एक
संगे घेऊन आला होता मुलगा त्याचा छोटा
पैसा होता खूप तरीही वृत्ती होती नेक
दु:ख होतं एकच मुलगा लाडावलेला होता || १ ||
फार दुरून आला होता ऐकून ज्यांचे नाव
त्या स्वामींना पाहून त्याने वाकून प्रणाम केला
स्वामीजींच्या चेहेऱ्यावरती तेज:पुंज भाव
शेटजीच काय मुलगादेखील पाहून भारून गेला || २ ||
म्हणे शेटजी सल्ला तुमचा ह्याने ऐकला तर
करेल माझा मुलगा आपल्या दुर्गुणांवरी मात
सांगा त्याला सारखी सारखी खाऊ नकोस साखर
डॉक्टर म्हणती नाहीतर किडून जातील ह्याचे दात || ३ ||
स्वामीजी म्हणाले डोळे रोखून आपले घारे
ठाऊक आहे आला आहात लांघून मोठे अंतर
माझ्याकडून होतील तेवढे यत्न करीन सारे
मुलगा तुमचा घेऊन या पंधरा दिवसांनंतर || ४ ||
पाहून सात्विक भाव स्वामीजींच्या शीतल नयनी
वाटे शेटजीला त्यांच्या वचनामध्ये तथ्य
पंधरा दिवसांनंतर लीन झाला त्यांच्या चरणी
पुन्हा घेऊन आला आपले एकुलते अपत्य || ५ ||
स्वामीजींनी जवळ घेतले बालक सुहास्य वदने
समजावूनी सांगती तयाला साखर खावी कमी
वदला बालक ऐकून त्यांची साधी साधी वचने
खार्इन साखर कमी तुम्हाला देतो ह्याची हमी || ६ ||
शेटजीस त्या हर्ष जाहला एक प्रश्न पण पडे
इतुका साधा उपाय होता स्वामीजींच्या पाशी
विचारतो तो का थांबवले मजला दोन आठवडे
सांगा उपदेशाच्या होते कारण काय मुळाशी || ७ ||
प्रश्न ऐकूनी स्वामीजी मग प्रसन्नतेने हसले
वदले दोन आठवडे साखर मी सोडून पाहिली
निग्रह करता येतो जेव्हा मनात माझ्या ठसले
तेव्हा माझ्या उपदेशाची किंमत ती राहिली || ८ ||
आत्मविश्वास मनात माझ्या जेव्हा होर्इ सखोल
तेव्हा वदलो बालकास त्या निर्मल अंत:करण
ऐकून स्वामीजींचे तेथे दैवत्वाचे बोल
गद्गद होऊन जार्इ शेटजी धरी तयांचे चरण || ९ ||
2 Comments
नावाप्रमाणेच नवनिर्मित खूप छान वाचनीय आनंद
मनःपूर्वक धन्यवाद!