शिकवण
मार्च 18, 2011बेडूकशाही
ऑगस्ट 19, 2011अघोरी
जून ४ हा दिवस राष्ट्रसंघाने क्रौर्यामुळे बळी जाणाऱ्या बालकांचा दिवस म्हणून जाहीर केला आहे. ह्या क्रौर्याचा संबंध जरी युद्धकाळाशी असला तरी आपल्या समाजातही ह्या दिवसाचा संदर्भ महत्वाचा आहे. लहान मुलांवर हात उगारणं म्हणजे स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या व्यक्तीवर केलेला भ्याड अत्याचार. मुलांना सुधारण्याकरता त्यांना मारण्याआधी पालकांनी स्वतःला आरशात पाहावं. आपण ऑफिसला न जाण्याकरता खोटं कारण द्यायचं आणि मुलांनी खोटं बोललं की त्यांना मारायचं ह्यातील दांभिकता मुलांना लगेच समजते. माझी ‘अघोरी’ ही काव्यकथा लिहिताना मला बराच त्रास झाला. ती वाचताना कदाचित तुम्हालाही त्रास झाला तर ती सर्वस्वी माझी चूक असेल. पण कधी कधी एखादा मुद्दा जोरकसपणे मांडण्याकरता काहीतरी धक्कादायक लिहिणं भाग असतं …
रविवारची सकाळ
माझी धूत होतो कार
नवीन माझी कार
मला प्रिय होती फार || १ ||
पाउस पडला होता
कालची सारी रात
लावून देणार नव्हतो पण
अन्य कोणा हात || २ ||
चिंटू उठला होता
आज मजा करायचा वार
खेळत होता कारभोवती
वय त्याचं चार || ३ ||
डावी बाजू धुवू लागलो
बदलून साबणपाणी
दगड पत्य्रावर घासल्याचा
आवाज आला कानी || ४ ||
जाऊन पाहिलं डोळ्यावरती
विश्वास बसला नाही
कारच्या दारावर चिंटू
लिहित होता काही || ५ ||
मस्तकशूळ उठला माझा
हरपून गेलं भान
तडक त्याला धरून त्याचा
जोरात पिळला कान || ६ ||
विचार करण्यापलीकडे मी
गेलो होतो पार
मिळेल त्याने हातावरती
केले चार प्रहार || ७ ||
दगड होता हाती त्याच्या
बंद होती मुठ
तरीही थांबलो नाही त्याला
मारलं मी बेछूट || ८ ||
कळवळून ओरडला तो
गेली त्याची शुद्ध
रक्त पाहून हातावरचं
मीही झालो स्तब्ध || ९ ||
पाहून मलूल चेहरा हृदयी
उठली माझ्या कळ
तडक उचललं त्याला आणि
गाठलं इस्पितळ || १० ||
डॉक्टरांनी उपचार केले
शुद्ध त्याला आली
चेचली होती पण संपूर्ण
तीन बोटं गेली || ११ ||
परत आलो कारवर
काढला माझा राग
तोडू लागलो त्याच पान्याने
कारचे सारे भाग || १२ ||
तोडता तोडता नजर गेली
उजव्या दारावर
पाहून पार कोसळलो मी
लिहिलं जे त्यावर || १३ ||
‘आय लव माय डॅडी’
पत्य्रावरती होते शब्द
वाचून शब्द वाकडे तिकडे
काळीज माझं दग्ध || १४ ||
शंभर गाड्या ओवाळीन मी
सांगत नाही खोटं
चिंटूची जर परत येणार
असतील तीन बोटं || १५ ||
आजही चिंटू माझ्यावरती
तितकंच प्रेम करतो
पण हाताकडे पाहत आपल्या
नेहमी प्रश्न पुसतो || १६ ||
कधी उगवतील माझ्या हाती
बोटं माझी परत
प्रयत्न केला तरीही मनातून
प्रश्न नाही तो सरत || १७ ||
अघोरी मी वागलो त्याची
बोटं झाली वजा
चूक माझी एकट्याची पण
भोगतोय दोघं सजा || १८ ||