बूट
डिसेंबर 6, 2013प्रतिशोध
जानेवारी 3, 2014अंधश्रद्धा
अंधश्रद्धांच्या भंपक कल्पना आपल्या मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की संकटाच्या वेळी आपली कशावर किंवा कुणावर अंधश्रद्धा नाही ह्या गोष्टीची भीती वाटू लागते. वाटतं की आपल्या हेकेखोरपणामुळे कुणाचं नुकसान तर होणार नाही ना . . .ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/o8vnBTlA_3Q ह्या ठिकाणी ऐकता येईल.
इस्पितळात बसलो होतो काळजीमध्ये बेजार
मुलगा आमचा भरती होता वय होतं चार
एकुलता एक मुलगा आमचा आमचं सर्वस्व
दोघांच्याही आयुष्यावर त्याचंच वर्चस्व
चारच दिवसांपूर्वी होता प्रसंग आला भलता
जागच्या जागी कोसळला तो चांगला खेळता खेळता
डॉक्टरांना कळत नव्हतं झालंय नक्की काय
ऑपरेशन करणं ठरला शेवटचा उपाय
ऑपरेशनसाठी त्याला नेलं होतं आत
आमच्या हाती होतं आता फक्त पाहणं वाट
ठाऊक होतं वाचण्याची संधी होती कमी
डॉक्टर म्हणत होते देऊ शकत नाही हमी
बसलो होतो वाट पाहत मी अन् माझी बायको
सुन्न मनं वाटत होतं बोलायलाही नको
माझे विचार माझ्याजवळ तिला तिचे विचार
दोघांच्याही विचार करण्यात अंतर होतं फार
लहानपणी मुलासाठी नवस बोलली होती
फेडला नाही म्हणून आता विपदा आली होती
चार दिवस घेतला तिने देवाचाच ध्यास
माझा मात्र विज्ञानावर अढळ असा विश्वास
तिच्या त्या वागण्याला होतो अंधश्रद्धा म्हणत
माझं असं वागणं मात्र तिला नव्हतं पटत
तिच्या मते तर संकटसमयी कामी येते श्रद्धा
मला म्हणाली विज्ञानावर तुझी अंधश्रद्धा
चार दिवस लागली होती दोघांची कसोटी
माझा विश्वास कमकुवत की तिची श्रद्धा खोटी
अनंत काळ गेला आणि डॉक्टर बाहेर आले
आनंदी चेहर्याने मग आम्हाला म्हणाले
मुलगा आहे सुखरूप तुमची काळजी झाली दूर
शब्द ऐकुनी दोघांच्याही डोळ्यांवाटे पूर
त्यांना म्हटलं तुमच्यामुळेच पेलवला हा भार
मला म्हणाले माना तुम्ही देवाचे आभार
गौण झाला होता आता वादाचा तो मुद्दा
होती श्रेष्ठ तिची श्रद्धा का माझी अश्रद्धा
संकट टळलं आहे म्हणून खरं तुम्हाला सांगतो
अशा वेळी विश्वास आपला डळमळीत होतो
एकदा वाट सोडून मन गेलं होतं वाकडं
विषपरीक्षा नको देवास घालावं का साकडं
आला होता आमच्यावरती प्रसंग बाका बडा
तिच्या श्रद्धेलाही गेला असेल का हो तडा
दुखावणारा प्रश्न विचारून साधलं नसतं काही
म्हणून असला प्रश्न तिला मी विचारलाच नाही
आणखीन एक प्रश्न पडतो जातो धास्तावून
राहिली आमची श्रद्धा अढळ संकट टळलं म्हणून
घडू नये ते घडलं असतं अभद्र जर त्या दिवशी
श्रद्धा आमची राहिली असती अभेद्य का हो अशी
प्रश्न असा आहे की नेहमी लावी मना चुटपुट
बंदच बरी आहे सव्वा लाखाची ती मूठ