
न वटलेला चेक
एप्रिल 7, 2025एका मैत्रीचं थडगं

आपल्या समाजात एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडते एवढं एक कारण मैत्री होण्याकरता पुरेसं नसतं, जेव्हा त्यातली एक व्यक्ती पुरुष आणि दुसरी स्त्री असते आणि त्यातलं कोणीही विवाहित असतं. अश्या मैत्रीकरता ‘गळचेपी’ हे एकच अंतिम सत्य असतं.
ती वेंटिलेटरवर आहे
अंहं.. कोण नाही, काय असं विचारा
एक मैत्री, एक सुंदर मैत्री
मला माहीत आहे, आयुष्यापेक्षा मोठं काहीच नसतं
पण काही गोष्टी आयुष्याला अर्थ देतात
त्यातलीच ही एक
अवचित आयुष्यात आली, वाढत गेली, सवय लावली आणि एक दिवस..
खुंटली!
काहीतरी करणं भाग होतं
मी प्रयत्न केला.. आणि ती एकदम मरणासन्न झाली
होणारच.. माझा प्रयत्न होताच मुळी समाजनियमांच्या विरुद्ध
एक पुरुष आणि एक स्त्री ह्यांच्यात मैत्री कशी हवी?
निर्मळ, प्लेटॉनिक..
दोन सज्ञान व्यक्तींची सहमती वगैरे सगळं झूठ, अंधश्रद्धा
वेंटिलेटर म्हणजे धुगधुगी कायम ठेवण्याचा कृत्रिम प्रयत्न
समोरून काही प्रतिसादच नसेल.. तर एकदम कुचकामी
म्हटलं तर जिवंत, नाहीतर..
आणि वेंटिलेटरलाही इंधन लागतं.. इमोशनल
माझा भावनिक इंधनाचा साठा अमर्याद नाही.. कधीतरी संपणारच
मनाची तयारी करतोय
मनाच्या एका कोपऱ्यात थडग्याची जागा निश्चित करतोय
होय.. दहन नाही.. दफन
त्यावर एक सुंदर संगमरवरी दगड.. कायमचा
आनंद, दुःख वाटून घ्यायची सवय मोडून चालणार नाही
थडग्याची एक सोय असते
मन मोकळं करायला ती एक हक्काची जागा असते ॥