स्त्री
मार्च 8, 2020पाचावर धारण
मे 1, 2020एकांतवास
आज जागतिक आरोग्य संस्थेचा (WHO) स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. भौतिक उन्नतीमागे भ्रमिष्टाप्रमाणे धावताना आपलं मानसिक आरोग्य हरवून बसलेल्या लोकांना कोरोना विषाणूच्या रुपात जणू आपल्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची एक शेवटची संधी मिळाली आहे – गर्दीतील एकांतवास संपवण्याची …
नोकरी करायला लागलो तेव्हा डोक्यावर प्रगतीचं भूत होतं स्वार
दिवस नाही रात्र नाही कष्ट केले अपार
सगळे उपाय वापरले साम दाम दंड भेद
थांबलो नाही कोणाकरता नाही केला कधी खेद
चढलो वर इतरांच्या खांद्यांवर डोक्यांवर देत पाय
पदोन्नतीच्या शक्यतेला होऊ दिला नाही अपाय
दमछाक झाली पण थांबलो नाही गाठलं पार शिखर
बाकी सारे राहिले होते मागे दूरवर
पण ओसरल्यावर विजयाचा उन्माद वाटू लागलं उदास
उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥ १ ॥
आनंद वाटण्याकरता कुणीच राहिलं नव्हतं बाकी
इतका वर चढून झालो होतो मी एकाकी
प्रतिस्पर्धी असले तरी इतके दिवस होते माझे सहचारी
आता कुणीच नव्हतं होते फक्त कर्मचारी
घाबरून होते मला मी बोललो की डोलत होते
माझा प्रत्येक शब्द आपल्या ओंजळीमध्ये तोलत होते
माझा प्रत्येक शब्द समजून घ्यायला लागत होती चढाओढ
मला समजून घ्यायची मात्र कुणालाच नव्हती ओढ
नाही कुणी रागावत नाही म्हणत कुणी शाब्बास
उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥ २ ॥
कुठे गेले कोणास ठाऊक पण विखुरले सर्वत्र
गल्लीमधले शाळेमधले कॉलेजमधले मित्र
अधूनमधून भेटतात क्वचित अचानक कुठेतरी
बोलावं काय तेच समजत नाही मध्ये एवढी खोल दरी
जिवाभावाचे मित्र सारे कसे एवढे दूर गेले
पण त्यांच्याशी संबंध ठेवण्यासाठी मी तरी काय प्रयत्न केले
येतात अजून काही कधी भेटायला शोधत
पण मैत्रीकरता नाही, त्यांना हवी असते मदत
गेले ते दिवस जेव्हा गप्पा रंगायच्या तासंतास
उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥ ३ ॥
पैसा आला गाड्या आल्या घरही बांधलं मजबूत
घरच्यांकरताच सारं काही मनाची घालत होतो समजूत
चढता आलेख होता माझा घरी भौतिक सुखं सारी आली
कुटुंबाशी मानसिक संबंधांची मात्र पायमल्ली झाली
प्रेमाची कसर पैशाने भरत मानत होतो मी समाधान
घरातली प्रत्येक व्यक्ती झाली जशी स्वायत्त संस्थान
घरात समारंभ असला की येत असे पाहुण्यांना पूर
घरातील मंडळी मात्र झाली मनाने एकमेकांपासून दूर
रोज रात्री एकट्याने जेवण जेवताना घशातून उतरत नव्हता घास
उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥ ४ ॥
आणि मग एक दिवस साऱ्या ब्रह्मांडानेच जणू रचलं एक कारस्थान
विषाणूच्या रुपात उलगडलं मानवी इतिहासातील एक काळं पान
कोण वरिष्ठ कोण कनिष्ठ बंद घरांत साऱ्यांची एकच पातळी
बाकी सारं दुय्यम जेव्हा मृत्यूची पसरते काजळी
सामाजिक माध्यमांतून का होईना भेटू लागले मैतर
‘ती सध्या काय करते’सारख्या प्रश्नांचेही मिळू लागले उत्तर
आधी मनाविरुद्ध बिचकत घरच्यांशी जमत नव्हता मेळ
पण जुनी नाती नव्याने जुळण्याकरता फार लागला नाही वेळ
भौतिक उन्नातीने सुख मिळतं हा असतो केवळ फसवा आभास
एक – शेवटचीच बहुतेक – संधी मिळाली आहे, ह्यापुढे नको तो एकांतवास ॥ ५ ॥