नग्न सत्य
मे 5, 2024एकमत
‘जात नाही ती जात’ हे साचेबंद वाक्य कितीही घासून गुळगुळीत झालं तरी ते कालबाह्य होणार नाही काळजी आपण निगुतीने घेतो. नवीन शेजारी असो, नवीन सहकर्मचारी असो किंवा अगदी स्वतःचं फक्त पहिलं नाव लावणारी एखादी अभिनेत्री असो.. त्यांचं आडनाव समजेपर्यंत आपल्याला अगदी चैन पडत नाही. त्यामुळे मग लग्नाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. उपहासपूर्ण लेखनाकरता प्रसिद्ध हिंदी लेखक हरीशंकर परसाई ह्यांच्या एका कथेवर आधारित ही कविता..
रामराव आणि शामराव होते सख्खे शेजारी
कुटुंबं त्यांची एकमेकांच्या सहवासात रमत
रामराव आणि शामराव मात्र शिष्ट होते भारी
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥
चढाओढ चाले त्या दोघांची लहान लहान गोष्टीत
एकमेकांना नावं ठेवताना दोघं नसत दमत
सणा समारंभात म्हणत आमचीच वरचढ रीत
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥
रामरावांचा मुलगा होता शामरावांची मुलगी
पडले प्रेमात एकमेकांशिवाय नव्हतं करमत
दोघांच्याही पित्यांना ही पटणार नव्हती सलगी
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥
असल्या गोष्टी लपत नसतात कळलंच एका रात्री
रामराव आणि शामरावांवर कोसळला जणू पर्वत
आपलीच जात श्रेष्ठ होती दोघांनाही खात्री
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥
मित्र त्यांचा होता एक गेले त्याच्या घरी
दोघांचीही मुलं आता त्यांचं नव्हती ऐकत
त्या मित्राचं बोलणं जरा ऐकून घेत जरी
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥
मित्र म्हणाला ह्या नात्याचा केलात तुम्ही अव्हेर
व्यभिचार होईल तो तुम्हाला कसं नाही समजत
व्यभिचार चालेल लग्न चालणार नाही जातीबाहेर
आयुष्यात आज प्रथमच झालं दोघांचं एकमत ॥
माझी जात वरचढ आणि त्याची आहे कोती
काळानुरूप न बदलता बसले पाय ओढत
एवढा मोठा देश त्यात अठरा पगड जाती
जात नाही ती जात ह्यावर सर्वांचं एकमत ॥