सणावली
एप्रिल 6, 2019सरनौबत
मे 5, 2019आली निवडणूक
उद्यापासून मतदानाला सुरुवात होईल. दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिक्स किंवा विश्वचषक स्पर्धांप्रमाणे दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. त्या स्पर्धांप्रमाणेच निवडणुकांचाही मनोरंजन गुणांक (entertainment quotient) फार मोठा असतो. त्या स्पर्धांप्रमाणेच निवडणुकीतील विजेते सारं काही घेऊन जातात. आणि त्या स्पर्धांप्रमाणेच मधल्या काळात नक्की काय होतं ह्याचं आपल्याला सोयरसुतक नसतं…
गळ्यात सोनं बोटांत अंगठ्या अंगात मात्र खादी
फोर्ड स्कॉर्पिओ ऑडी आणखीन मर्सिडीज एखादी
अशी माणसं दारी आली ओळखावं अचूक
आली निवडणूक ॥ १ ॥
आरोपांच्या चिखलफेकीचा माजला गदारोळ
चव्हाट्यावरी लक्तरं धुती भिडती जैसे पोळ
प्रत्येकाची लफडी बाकी साऱ्यांना ठाऊक
आली निवडणूक ॥ २ ॥
दारी येती हात जोडूनी अनोळखी ते चेहेरे
गाढ मैत्रीचे हसणे साऱ्या चेहेऱ्यांवरती लहरे
विचारपूस करतात आपुली होऊन ते भावूक
आली निवडणूक ॥ ३ ॥
जाहीर म्हणती जात धर्म ते सर्व आम्हा सारखे
खाजगीत पण तेच वागती नीतीला पारखे
आज अचानक सहिष्णुतेची करती ते जपणूक
आली निवडणूक ॥ ४ ॥
दीन आणखी दलितांचा येई त्यांना कळवळा
दारिद्र्याचा चिखल पाहूनी अश्रू येती घळघळा
समाजोद्धार करण्याची मग लागे त्यांना भूक
आली निवडणूक ॥ ५ ॥
अलंकार अन् गाड्यांची त्या ठाऊक तुम्हा किंमत
आले कोठून विचारण्याची नाही तुमची हिंमत
घरकूल तुमचे छोटे त्याची करा तुम्ही जपणूक
आली निवडणूक ॥ ६ ॥
सामाजिक माध्यमांत होई प्रचाराचा भडिमार
प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडू नका तुम्ही फार
मित्र कोणता तुमचा धरील तुमच्यावरती डूख
आली निवडणूक ॥ ७ ॥
सुट्टी आली अचानक पाहा वाह वा फारच छान
केस कापण्या जाताना मग उरकून या मतदान
पुढची पाचही वर्षेंं व्हा मग पुन्हा एकदा मूक
आली निवडणूक ॥ ८ ॥
कर्णकर्कश वाद्य आणखी फटाक्यांचाही जोर
निवडून दिला पाहा तुम्ही हो नवा कोणता चोर
पाहा मॄत नजरेने तुमच्या भव्य ती मिरवणूक
झाली निवडणूक ॥ ९ ॥